शिक्रापूर (वार्ताहर) – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे एक जानेवारी शौर्यदिनी होणाऱ्या विजय रणस्तंभ मानवंदना कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आमदार रोहित पवार यांनी विजयस्तंभास भेट देत पाहणी केली. यावेळी पवार यांनी कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे.
कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी रोजी विजय रणस्तंभ मानवंदना कार्यक्रम होत्या उत्साहात होत असताना दोन वर्षांपूर्वी अचानक हिंसाचार होऊन कोट्यवधींचे नुकसान झाले. त्यांनतर शासनाने याकडे लक्ष केंद्रित करत सर्व कार्यक्रम शासकीय देखरेखीत करण्यास सुरुवात केली. एक जानेवारीच्या कार्यक्रमादरम्यान नुकतीच आमदार रोहित पवार यांनी विजय रणस्तंभास भेट दिली. यावेळी पेरणेचे सरपंच रुपेश ठोंबरे, पंचायत समिती सदस्या संजीवनी कापरे, उपसरपंच रवींद्र वाळके, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार पवार यांनी प्रशासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेत पाहणी केली आहे. पेरणे ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात येत असलेल्या सुविधांचे कौतुक केले आहे.शौर्यदिनाची तयारी पूर्ण झालेली असून येणाऱ्या समाज बांधवांना आवश्यक सर्व सोयी सुविधा येथे उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. सर्वांनी शांततेत येऊन मानवंदना द्यावी, असे आवाहन कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी केले आहे.