राजश्री घुले अध्यक्ष, तर प्रताप शेळके उपाध्यक्षपदी बिनविरोध, भाजपची निवडणुकीतून सपशेल माघार
नगर – जिल्हा परिषद अध्यक्ष -उपाध्यक्षपदाकरता महाविकास आघाडीकडे ठोस बहुमत असल्याचा अंदाज आल्याने भाजपाने या निवडणुकीतून सपशेल माघार घेण्याची भूमिका घेतली. त्यामुळे महाआघाडीतील राष्ट्रवादीच्या राजश्री घुले यांची अध्यक्षपदी, तर कॉंग्रेसचे प्रताप शेळके यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक आज जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये पार पडली.उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके, तसेच निवडणूक शाखेच्या तहसीलदार वैशाली आव्हाड, अव्वल कारकून नीता कदम यांनी सहाय्य केले.
आज सकाळी महाविकासआघाडीची म्हणजेच कॉंग्रेस-राष्ट्रवादी,शिवसेना व शेतकरी क्रांतीकारी पक्ष यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीमध्ये अध्यक्षपदाकरता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राजश्री घुले तर उपाध्यक्षपदाकरता कॉंग्रेसचे प्रताप शेळके यांच्या नावाची निवड करण्यात आली होती .
त्यानंतर दुसरीकडे माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयामध्ये भाजपाची बैठक पार पडली. या बैठकीला आमदार राधाकृष्ण विखे, राम शिंदे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपाच्या वतीने पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. यावेळी अध्यक्ष पदाकरता भाजपकडून सुनिता खेडकर तर उपाध्यक्षपदाकरता संध्या आठरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
दुपारी तीन वाजता निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सुरुवातीला अर्जाची छाननी करण्यात आली. अध्यक्षपदासाठी उमेदवारी माघार घेण्याच्या मुदतीमध्ये खेडकर यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीच्या घुले अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आल्या.
त्यानंतर उपाध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून प्रताप शेळके यांनी अर्ज दाखल केला होता .तर भाजपकडून संध्या आठरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता .यामध्ये सुद्धा भाजपच्या आठरे यांनी माघार घेतल्यामुळे आघाडीचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांची बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीचे सदस्य एकत्रितपणे जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाले. यावेळी शिवसेनेच्या वतीने जय भवानी जय शिवाजी अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सभागृहांमध्ये रांगेमध्ये बारा याप्रमाणे आघाडीचे नगरसेवक बसले होते.
विखे यांच्यासह त्यांचे दहा सदस्य स्वतंत्ररित्या बसले असतानाच कॉंग्रेसचे गटनेते अजय फटांगरे यांनी त्यांचे सदस्य आल्या आल्या त्यांना व्हीप बजावण्यात सुरुवात केली असताना विखे व फटांगरे यांच्यामध्ये चांगलीच शाब्दीक खडाजंगी झाली. पक्षनेता बदलताना आम्हाला विश्वासात घेतले नाही. तुमच्या मनात खोट होती असा आरोप त्यांनी सभागृहांमध्ये केला. त्यातच विखे यांचे समर्थक भाऊ राजेश परजणे यांनी सुद्धा आम्हाला विश्वासात घेतले नाही असा आरोप केला. यावेळी कॉंग्रेसचे गटनेते अजय फटांगरे यांनी सभागृहात विखे गटाच्या सदस्यांनां व्हीप बजावला. विखे यांनी आज निवडणूक सुरू होण्यापूर्वी सर्व सदस्यांना समक्ष भेटून आभार मानले.
काकडे -घुले यांची दिलजमाई
नव्याने निवडून आलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले व जनशक्ती आघाडीच्या सदस्या हर्षदा काकडे यांचे विळ्या-भोपळ्याचे सख्य सर्वश्रुत आहे मात्र आज हर्षदा काकडे यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला व आम्ही तालुक्यासाठी एकत्र आलो असे काकडे यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.