आमदार पिता-पुत्रांवर तोफ डागत किरण काळे राष्ट्रवादीतून बाहेर

नगर – विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये खिंडार पडायला सुरुवात झालेली असतानाच स्थानिक पातळीवर अंतर्गत वाद राष्ट्रवादी मध्ये उफाळलं आला. प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष किरण काळे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्त केला असल्याची माहिती किरण काळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, मी गेल्या नऊ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतो. पक्षातील स्थानिक नेतृत्व नगर शहराच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने योग्य नाही, मला आणि सामान्य नगरकरांनी प्रतीक्षा असणाऱ्या नगर विकासाच्या दृष्टीने मी लवकरच महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे, याच कारणामुळे मी माझ्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाकडे आज दिला असेही काळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

समाजातील नेतृत्व करण्यासाठी शहरात व्हीजन असलेल्यांना नेतृत्व दिले जावे यासाठी देखील पक्षात कायम आग्रह धरत होतो परंतु यामध्ये दुर्देवाने मागील अप्रिय निर्णयाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगून देखील स्थानिक नेतृत्वाने पक्षविरोधी निर्णय घेतला. कायम पक्षाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. आत्ता देखील सर्व पक्षांचे उंबरठे झिजवून झाल्यानंतर स्वतःच्या प्रसिद्ध कार्य कौशल्यामुळे आपल्याला कोणीही कोणत्या पक्षात प्रवेश घ्यायला तयार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांना पुन्हा राष्ट्रवादीची आठवण झाली असा टोला त्यांनी आमदार अरुण जगताप व संग्राम जगताप यांचे नाव न घेता यावेळी लगावला आहे.

पक्षनिष्ठा कायम वेशीवर टांगणाऱ्यांकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा काय असू शकते असा सवालही काळे यांनी यावेळी उपस्थित केला.

शहराच्या पातळीवर अनेक वर्ष ज्यांच्या बरोबर मला काम करण्याची अपरिहार्यता होती त्यातूनच माझी कायम घुसमट झाली. कधीही शहर विकासामध्ये सदर नेतृत्वाने गांभीर्य दाखवले नाही, स्थानिक नेतृत्वाला विकासापेक्षा इतर प्रकारच्या राजकारणात अधिक असल्यामुळे ते आमचे कधीच होऊ शकले नाही.

पक्षाचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी देखील जातीने लक्ष घालून आम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिक नेतृत्व आणि माझ्याकडे असलेल्या टोकाच्या वैचारिक तफावतीमुळे त्यांच्या विचारांचा स्वीकार करणे मला कधीच जमले नाही, त्यामुळे शहर विकासासाठी मी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला असून आज मी माझ्या पदाचा तसेच सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. पुढील राजकीय वाटचालीची सुद्धा लवकरच घोषणा करणार असल्याचे किरण काळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)