शिक्रापूर – रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. युद्ध सुरु आहे. त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील काही विद्यार्थी अडकले आहेत. शिरूर हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.
शिरूर तालुक्यातील काही विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेले आहेत. सध्या युक्रेन तेथे युद्ध सुरु आहे. अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहेत, त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील काही युवकांचा समावेश आहे. या युवकांपैकी काही युवकांशी आमदार पवार यांनी संवाद साधत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना आपल्या मूळ गावी आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगून धीर दिला.
तसेच विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी तातडीने मला संपर्क करावा मी विद्यार्थ्यांसाठी तत्पर असून सायंकाळी देखील तुमच्याशी संवाद साधून तुम्हाला सर्व माहिती व घडामोडी कळवणार असल्याचे आमदार पवार यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
यावेळी शिरूर तालुक्यातील युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी युक्रेन मधील माहिती देत महाविद्यालय प्रशासनाने सध्या आमची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे, मात्र येथून बाहेर पडणे अशक्य असून बाहेर काय घडतं आहे, याची कोणतीही माहिती मिळत नाही, आम्हाला आता आपल्या गावची ओढ लागली असल्याचे आमदार अशोक पवार यांना सांगितले.