नवी दिल्ली – ऑगस्ता वेस्टलॅंड हेलिकॉप्टर व्यवहारात मध्यस्थ म्हणून काम केलेला ख्रिस्तीयन मिचेल जेम्म याने केलेला अंतरिम जामीन अर्ज आज दिल्ली उच्च न्यायालयाने पुन्हा फेटाळून लावला आहे. त्याच्या अंतरिम जामीनाच्या अर्जावर न्या. मुक्ता गुप्ता यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सुनावणी घेतली. आपले वय लक्षात घेता आणि तुरुंगातील गर्दी लक्षात घेता आपल्याला करोनाची लागण होऊ शकते म्हणून आपल्याला हंगामी स्वरूपाचा जामीन मंजूर करावा, अशी विनंती त्याने न्यायालयाला केली होती.
पण न्यायालयाने त्याचे हे म्हणणे अमान्य केले. मिचेल याला स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे त्याला अन्य कैद्यांबरोबर एकत्रित स्वरूपात ठेवण्यात आलेले नाही त्यामुळे करोनाची त्याने व्यक्त केलेली भीती निरर्थक आहे असे कोर्टाने म्हटले आहे. तिहारमध्ये त्याला अत्यंत सुरक्षित स्थितीत ठेवण्यात आल्याची माहिती सीबीआय व ईडीच्यावतीने देण्यात आली आणि त्यांनीही त्याच्या जामिनाला विरोध केला होता.