पर्थ (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियातील खाण उद्योगातील कर्मचारी आणि अधिकारी एका छोट्या वस्तूच्या गायब होण्यामुळे प्रचंड भयभीत झाले आहेत. गवताच्या गंजीमधून सुई शोधून काढण्यासारखे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे. हे सर्वजण एका छोट्या रेडिओअॅक्टिव्ह कॅप्सूलचा शोध घेत आहेत. ही कॅप्सूल 1400 किलोमीटरच्या रस्त्यावर कोठेतरी हरवली आहे. ही कॅप्सूल हरवल्यामुळे अनेकांना घाम फुटल्याचे कारण म्हणजे ही कॅप्सूल किरणोत्सर्ग करणारी आहे. या कॅप्सूलमधून गॅमा किरण बाहेर पडत आहेत. हे गॅमा किरण अत्यंत घातक असू शकतात.
सेसियमची ही कॅप्सूल अवघी 6 एमएम बाय 8 एमएम आकाराची आहे. एखाद्या छोट्या नाण्यापेक्षाही लहान आकाराची ही कॅप्सूल माणसाच्या नखापेक्षाही लहान आहे. एका ट्रकमधून ही कॅप्सूल कोठेतरी पडली आहे. हा ट्रक पिलबारा प्रांतातील रिओ टिंटोमधील गदाई दारी खाण उद्योगातून निघून पर्थ येथे जात असताना ही कॅप्सूल हरवली आहे.
मात्र 25 जानेवारीला कंपनीने केलेल्या तपासणीदरम्यान ही कॅप्सूल हरवली असल्याचे उघड झाले आहे. यापूर्वी ही कॅप्सूल 12 जानेवारीला बघितली गेली होती. त्यानंतर ही गायब झाली.
ट्रकच्या प्रवासादरम्यान हादऱ्यांमुळे ही कॅप्सूल असलेली केस सैल झाली असावी, असा अंदाज आहे. या केसचे काही स्क्रू सैल झाल्याचेही तपासणीत आढळले आहे. आता ही कॅप्सूल अन्य ट्रकच्या टायरमध्ये अडकून कोठे गेली असावी याचा कोणालाच अंदाज येत नाही.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/priyanka-and-rahul-gandhi-visit-kheer-bhawani-temple-hazratbal-shrine-in-jammu-and-kashmir/
खबरदारीचा इशारा
या कॅप्सूलमधून किरणोत्सर्जन होत असल्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अपरिचित वस्तूला हात लावू नये, असा सावधगिरीचा इशारा जारी करण्यात आला आहे. ही कॅप्सूल जीवघेणी असणार नाही. मात्र किरणोत्सर्जनामुळे गंभीर आजार उद्भवू शकतात. या किरणोत्सर्जनामुळे त्वचेचा दाह होऊ शकतो किंवा दीर्घकाळ किरणोत्सर्जनाच्या सानिध्यात राहिल्यास कर्करोग होण्याचीही शक्यता नाकारता येऊ शकत नाही. गॅमा किरण हे अतिशय घातक किरण मानले जातात. त्यांच्या प्रबावामुळे “डीएनए’वरदेखील परिणाम होण्याचा संभव असतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.