नवी दिल्ली – लोकसभेत शिवसेनेच्या गटनेत्याला दिलेली बसण्याची जागा आणि कार्यालय या दोन्ही गोष्टींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा अधिकार असून हा अधिकार आम्हाला मिळायला पाहिजे, अशी मागणी मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) बैठकीत ही मागणी करून शेवाळे यांनी तेलाच्या उकळत्या कढईत पाणी शिंपडण्याचे काम केले आहे.
राहुल शेवाळे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे यांचा गट हाच मुख्य शिवसेना असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेच्या नेत्याला लोकसभेत बसायला दिलेली खूर्ची आणि संसदेच्या आवारात शिवसेनेला दिलेले कार्यालय या दोन्ही गोष्टींवर शिंदे गटाचा अधिकार असून त्या शिंदे गटाला देण्यात याव्यात. यासाठी शेवाळे यांनी लोकजनशक्ती पक्षाला दिलेल्या अधिकाराचा तर्क दिला आहे.
पंतप्रधानांच्या अनुपस्थितीमुळे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली “रालोआ’च्या घटक पक्षांची बैठक सोमवारी पार पडली. यात बोलताना शेवाळे म्हणाले की, शिवसेनेचे दोन तृतियांशपेक्षा जास्त खासदार शिंदे गटासोबत आहेत. त्यामुळे या दोन्ही गोष्टींवर आमचाच अधिकार आहे, असे म्हटले. तसेच बैठकीनंतर, या दोन्ही गोष्टी शिंदे गटाला लवकरच मिळतील असा दावाही शेवाळे यांनी केला आहे. ही एक प्रक्रिया असून ती लवकरच पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.
हा तर हपापलेपणा-सावंत
सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सुध्दा या मुद्यावरून शिंदे गटाचा समाचार घेतला आहे. बंडखोरीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशात ही मागणी करणे म्हणजे हपापलेपणा होय, असे ते म्हणाले.