पुणे – कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी “कसबा’साठी 16 उमेदवारांनी 27, तर “चिंचवड’साठी 20 उमेदवारांनी 34 अर्ज नेले. दरम्यान, पहिल्या दिवशी या दोन्ही मतदारसंघासाठी कोणीही अर्ज भरला नाही. दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत दि.7 फेब्रुवारी आहे.
या दोन्ही मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली असली, तरी अद्याप कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार जाहीर केलेला नाही. “कसबा’साठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे शहर प्रांताधिकारी स्नेहा किसवे, तर चिंचवडसाठी उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांची नियुक्ती केली आहे.
मतदान यंत्रणेचा आढावा
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात 270 मतदान केंद्र तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात 510 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम मशीन (बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट) आणि “व्हीव्हीपीएटी’ मशीन असणार आहे. या दोन्ही मतदारसंघात मिळून एकूण 780 मतदान केंद्र असून एकूण 1 हजार 720 ईव्हीएम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. या यंत्रणेची पहिल्या टप्प्यातील तांत्रिक तपासणी पूर्ण झाली आहे. उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुन्हा या मशिनची तपासणी केली जाणार आहे.
निवडणूक कार्यालय कोठे?
कसबा पेठ निवडणुकीसाठी निवडणूक कार्यालय हे गणेश कला क्रीडा मंच येथे स्थापन केले आहे. मात्र, येथे पुढील चार महिन्यांसाठी कार्यक्रमांचे बुकिंग झाले आहे. त्यामुळे येथील सांस्कृतिक कार्यक्रमांचे बुकिंग रद्द करावे लागेल. त्यामुळे पालिकेने कसबा पेठ निवडणूक कार्यालयासाठी जिल्हा प्रशासनाला चार- पाच जागा सुचविल्या असून या जागांचा विचार करावा, अशी विनंती पालिकेने जिल्हा प्रशासनाला केली आहे.