सत्तारूढ कॉंग्रेसचे तीन आमदार अजूनही नॉट रिचेबल
भोपाळ : मध्यप्रदेशातील कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारचे टेन्शन वाढवणाऱ्या चार बेपत्ता आमदारांपैकी एक जण शनिवारी येथे परतला. त्यानंतर मुख्यमंत्री कमल नाथ यांनाच पाठिंबा असल्याची ग्वाही संबंधित अपक्ष आमदाराने दिली.
दरम्यान, सत्तारूढ कॉंग्रेसचे तीन आमदार अजूनही नॉट रिचेबल आहेत. मागील काही दिवसांपासून मध्यप्रदेशात राजकीय सस्पेन्स निर्माण झाला आहे. कमल नाथ सरकार पाडण्यासाठी भाजपने सत्तारूढ गोटातील 14 आमदारांचे अपहरण केल्याचा आरोप नुकताच कॉंग्रेसने केला. त्यामुळे मोठीच राजकीय खळबळ उडाली.
त्यातून सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने मध्यप्रदेशातही ऑपरेशन कमल हाती घेतल्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र, सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप भाजपने फेटाळून लावला.
मध्यप्रदेशात राजकीय उलथापालथी सुरू झाल्याचे चित्र पुढे आले असतानाच काही काळासाठी बेपत्ता झालेले बहुतांश आमदार भोपाळमध्ये अवतरले. मात्र, चार आमदारांचा ठावठिकाणा काही दिवसांपासून लागू शकलेला नव्हता.
त्यातील सुरेंद्रसिंह शेरा हे अपक्ष आमदार शनिवारी परतले.
शेरा दिल्लीतून परतताच त्यांना राज्यातील एका मंत्र्याने विमानतळावरच गाठले. त्यानंतर शेरा यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले.
मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सरकारबरोबरच असल्याची ग्वाही दिली.आता इतर तीन आमदारही लवकरच परततील, असा विश्वास कॉंग्रेसकडून व्यक्त करण्यात येत आहे.