मुंबई : येस बॅंकेतील प्रत्येकी दहा रुपये किंमतीने 245 कोटी समभाग 2,450 कोटी रुपयांना दिले जातील, असे भारतीय स्टेट बॅंकेने शनिवारी सांगितले.
येस बॅंकेतले 49 टक्के समभाग खरेदी करायला भारतीय स्टेट बॅंकेच्या संचालक मंडळाने तत्वतः मंजूरी दिली आहे, असे स्टेट बॅंकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी आज मुंबईत वार्तांहर परिषदेत सांगितले.
भांडवली गुंतवणूकीच्या तारखेपासून तीन वर्ष पूर्ण होण्यापूर्वी “एसबीआय’ आपल्या ताब्यातील समभाग 26 टक्क्यांपेक्षा कमी करणार नाही, असेही “एसबीआय’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
येस बॅंकेच्या नवीन मंडळामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी नसलेले अध्यक्ष आणि कार्यकारी नसलेले संचालक असतील.
नव्याने उभारण्यात येणाऱ्या बॅंकेत सर्व कर्मचारी त्याच्या सेवेत कायम राहतील. तसेच किमान एका वर्षासाठी त्यांचे वेतन आणि अटी व शर्तींही कायम राहतील, असेही एसबीआयने सांगितले.