बीजिंग – चीनने आज अधिकृतपणे जाहीर केलेल्या नकाशाच्या 2023 च्या सुधारीत नकाशामध्ये अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन या भूप्रदेशांना चीनचा भूभाग म्हणून दर्शवण्यात आले आहे. अरुणाचल प्रदेशला चीनकडून नेहमीच दक्षिण तिबेट म्हणून संबोधित केले जात असते. तर चीनने 1962 च्या युद्धाच्यावेळी बळकावलेल्या अक्साई चीन हा भूभाग आहे.
या दोन भूभागांव्यतिरिक्त तैवान आणि वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रालाही चीनने आपल्या नकाशामध्ये चीनचा भाग म्हणून दाखवले आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनने 9 तुटक रेषांनी सागरी हद्द म्हणजे चीनची हद्द असल्याचे दाखवले आहे. चीन व्यतिरिक्त फिलिपीान्स, मलेशिया आणि ब्रुनेईनेही दक्षिण चीन समुद्रावर दावा केला आहे. मात्र या देशांच्या दाव्याला चीनने धुडकावून लावले आहे.
सर्वेक्षण आणि नकाशा प्रसिद्धी दिन आणि राष्ट्रीय नकाशा जनजागृती प्रसिद्धी सप्ताहाच्या निमित्ताने झेजियांग प्रांतातल्या देकिंग भागामध्ये चीनच्या नैसर्गिक स्रोत मंत्रालयाच्यावतीने हा नवीन नकाशा प्रसिद्ध करण्यात आला आहे. सर्वेक्षण, नकाशा आणि भौगोलिक माहिती देशाच्या विकासासाठी महत्वाची असते, असे चीनच्या नैसर्गिक स्रोत मंत्रालयाचे मुख्य नियोजक वू वेंन्झोंग यांनी म्हटले आहे. यापुढच्या काळात या नकाशाचे डिजीटल अर्थकारणाच्या विकासाच्या दृष्टीने या नकाशाच्या भौगोलिक माहितीचा उपयोग केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
मोदींनी व्यक्त केली होती “एलएसी’बाबत चिंता…
अलिकडेच “ब्रिक्स’ परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग येथे भेट झाली होती. त्यावेळी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अद्यापही कायम असलेल्या तणावाबाबत मोदींनी चिंता व्यक्त केली होती. दोन्ही देशांमधील संबंध सर्वसामान्य होण्यासाठी सीमाभागात शांतता आणि सौहार्दाचे वातावरण असणे आवश्यक असल्याचे मोदी म्हणाले होते.