कोलंबो – श्रीलंकेतील तुरुंग व्यवस्थापन राज्यमंत्री लोहन रातवेत यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अनुराधापुरा या भागातील तुरुंगाला भेट देण्यापूर्वी तेथील तामिळी कैद्यांना मारून टाकण्याची धमकी त्यांनी दिली होती. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर तमिळ राजकीय पक्षांनी तीव्र आक्षेप घेऊन त्यांच्या अटकेची मागणी केली होती.
या दबावामुळे रातवेत यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाये राजपक्षे यांनी स्वीकारला आहे, असे अध्यक्षांच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
रातवेत यांनी 12 सप्टेंबरला अनुराधापुरा येथील तुरुंगाला भेट दिली होती. तेथे त्यांनी दोन तमिळी कैद्यांना गुडघे टेकण्यास भाग पाडले होते.
या कैद्यांना त्यांनी ठार मारण्याचीही धमकी दिली होती. यावरून तमिळी राजकीय पक्षांनी रातवेत यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. रातवेत यांच्या कृत्याची चौकशी करण्यात यावी आणि त्यांना तातडीने अटक करण्यात यावी, असे तमिळ नॅशनल अलायन्सने एका ट्विटमध्ये म्हटले होते. “तमिळ नॅशनल पीपल्स फ्रंट’नेही तशीच मागणी केली होती.