नवी दिल्ली : देशातील गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभांचा कार्यकाळ येत्या सहा महिन्यांच्या आत संपणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून नुकताच हिमाचल प्रदेशमधील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. तर गुजरातच्या निवडणुकीचा कार्यक्रम अजून जाहीर केलेला नाही. दरम्यान, गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात आता आपसह आणखी एका पक्षाने एंट्री केली आहे.
‘एमआयएम’ने गुजरात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली आहे. याशिवाय गुजरातमधील काही भाजपा खासदार संपर्कात असल्याचाही दावा जलील यांनी केला आहे. “आम्ही गुजरात निवडणूक नक्कीच लढणार. आमचे पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितलेलं आहे की, आम्ही सर्व राज्यांमध्ये जिथे जिथे आमची ताकद आहे तिथे आम्ही निवडणूक लढणार आहोत.
आम्ही गुजरात विधानसभा निवडणूक लढवण्याचा कारण म्हणजे, जेव्हा आम्ही गुजरातला गेलो होतो, तेव्हा तिथल्या महानगरपालिका निवडणुकीचा निकाल हा आमचा मनोबल वाढवणारा होता. केवळ चार-पाच शहरांमध्येच आम्ही ही निवडणूक लढलो होतो आणि आमचे २६ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर जे ११ अपक्ष उमेदवार होते, जे विविध शहरांमधून आलेले होते, त्यांनाही आमच्या पक्षात प्रवेश केला. आमचे गुजरातचे अध्यक्ष हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत.” त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथे खूप चांगलं काम केलेलं आहे. असं जलील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.
याशिवाय “लोकांना बदल हवा आहे, त्यांचा विश्वास काँग्रेसवर राहिलेला नाही. म्हणून ते एमआयएमच्या बरोबर येणार आहेत. आतापर्यंत पाच जागांची घोषणा ओवेसींनी केलेली आहे. आणखी काही जागांची घोषणा ते करणार आहेत आणि पूर्ण ताकदीने आम्ही गुजरातची निवडणूक लढणार आहोत.” असंही यावेळी खासदार जलील म्हणाले.