कोरेगाव भीमा, पेरणे फाटा, वढु ब्रुद्रुकमध्ये भीमसैनिकांची मानवंदना
शिक्रापूर- कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे भीमा नदीच्या तीरावर असलेल्या ऐतिहासिक विजय रणस्तंभास मानवंदना देण्यासाठी 202व्या विजयदिनी विविध पक्ष, संघटना व मान्यवरांसह महाराष्ट्रासह परराज्यांतून आलेल्या लाखो समाज बांधवांच्या गर्दीने परिसर फुलून गेला होता. पेरणे फाटा, वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज, गोविंद गोपाळ यांच्या समाधीस्थळास अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध पक्ष, सामाजिक संघटनांतर्फे अभिवादन सभांचे आयोजन केले होते. पोलीस व महसूल प्रशासनामुळे यावर्षी मानवंदनेसाठी आलेल्या समाज बांधवांची चोख व्यवस्था झाल्याने समाज बांधवांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.
कोरेगाव भीमा येथील भीमानदीकाठी एक जानेवारी 1818 मध्ये इंग्रज, महार रेजीमेंट व पेशवे यांच्या सैन्यात घनघोर लढाई झाली. यात महार बटालियनच्या 500 शूरवीर सैनिकांनी पेशव्यांच्या 30 हजार सैनिकांचा पाडाव करून विजय मिळविला होता. यात महार रेजीमेंटच्या अनेक शूरवीरांना वीरमरण आले. या धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी 1822 मध्ये कोरेगाव भीमाजवळ भीमा नदीकाठी विजयस्तंभ उभारला आहे.
1927 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे याठिकाणी मानवंदनेसाठी येत होते. तेव्हापासून महाराष्ट्रासह परराज्यातून बांधव एक जानेवारीला मानवंदनेसाठी येऊ लागले. पेरणे फाटा येथे मंगळवारी मध्यरात्रीपासून नागरिकांनी गर्दी केली होती. दिवसभर रॅली, अभिवादन सभा घेऊन विजय रणस्तंभास मानवंदना देण्यात आली. पेरणेफाटा (ता. हवेली) येथे सकाळी समता सैनिक दलातर्फे विजय रणस्तंभास मानवंदना देण्यात आली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, आमदार ऍड. अशोक पवार, भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सी. एम. थूल, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर, बुद्दिष्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या मीराताई आंबेडकर, दलित कोब्राचे ऍड. भाई विवेक चव्हाण, बहुजन समाज पार्टी, भीमशक्ती, सामाजिक विकास संघटना, बहुजन सुरक्षा गट, झोपडपट्टी सुरक्षा दल, कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ, बुद्दिष्ट मुव्हमेंट सेंटर ट्रस्ट, फुले शाहू आंबेडकर विचार मंच, कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती आदी संस्थांचा समावेश होता. संघटनांनी विजय ज्योतीही आणल्या होत्या. यावेळी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी स्वागत केले.
यावेळी कोल्हापूर परीक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी समन्वय साधून मानवंदना सोहळा शिस्तबद्धपणे पार पडला.