म्यानमार – भारताचा शेजारी देश असलेल्या म्यानमारमध्ये लष्करानं सत्तापालट घडवून आणला आहे. लष्कराने म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू की, देशाचे राष्ट्रपती विन म्यिंट आणि सत्तारुढ पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांना अटक करत सत्ता आपल्या हाती घेतली आहे.
आज सकाळी झालेल्या एका छाप्यादरम्यान ही कारवाई करण्यात आल्याचे नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (एनएलडी) या पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. सत्ता ताब्यात घेतल्यानंतर लष्कराने देशात एका वर्षासाठी आणीबाणी जाहीर केली आहे. त्यामुळे लष्कराचे कमांडर इन चीफ मिन आंग ह्लाईंग यांच्या हाती सत्तेची सुत्रे आली आहेत.
एनएलडीचे प्रवक्ते म्हणाले, “आंग सान सू की, राष्ट्राध्यक्ष आणि इतर नेत्यांना आज सकाळी कुठेतरी नेण्यात आले. मी आपल्या लोकांना सांगू इच्छितो की, या वेळीही कायद्याचे पालन करा. मला स्वतःला अटक होण्याची शक्यता वाटते.” अटक सत्रावर म्यानमारच्या लष्कराने अद्याप काहीही म्हटलेलं नाही. एनएलडीने देशात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता.
म्यानमारच्या राजकारणातील महत्वाच्या नेत्या असलेल्या आंग सान सू की या ७५ वर्षीय महिला नेत्या २०१५ मध्ये राष्ट्रीय निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळवत सत्तेत आल्या होत्या. तत्पूर्वी त्यांना मोठ्या कालावधीसाठी राहत्या घऱी नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. यामुळे त्या आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रकाशझोतात आल्या होत्या.