आजपासून नव्या रुपात पुणेकरांच्या भेटीला
पुणे – ब्रिटिशकाळातील अखंड भारताच्या त्रिमीतीय सर्वेक्षणाची साक्ष देणाऱ्या स्टेशन परिसरातील मुख्य पोस्ट कार्यालयाबाहेरील “शून्य मैलाचा दगड’ (झिरो माइल स्टोन) आता नव्या रुपात पुणेकरांच्या भेटीला येणार आहे. मुळ दगड कायम ठेवत या परिसराचे नूतनीकरण महापालिकेकडून करण्यात आले आहे. यात प्रमुख्याने सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या आणि त्यासाठी बलिदान देणाऱ्यांची माहिती प्रदर्शित केली जाणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवारी महापौर मुक्ता टिळक आणि आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी गुरुवारी दिली.
असा आहे या दगडाचा इतिहास…
ब्रिटिशांच्या काळात कन्याकुमारीपासून ते हिमालयापर्यंत आणि मुंबईपासून ते ईशान्य भारताच्या किनारपट्टीपर्यंतच्या भागांत ठिकठिकाणच्या भूभागाचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये प्रत्येक ठिकाणचे अक्षांश-रेखांश, समुद्रसपाटीपासूनची उंची, भौगोलिक रचना याची माहिती संकलित केली गेली. या सर्वेक्षणाकरिता तब्बल 50-60 वर्षांचा कालावधी लागला. हे सर्वेक्षण यशस्वी करण्यासाठी राधानाथ सिकद्र आणि नैनसिंह रावत यांचा मोलाचा वाटा होता. त्याशिवाय पूर, साथीचे रोग आणि डोंगर-दऱ्या अशा सर्व आपत्तींना समर्थपणे तोंड देत अनेक सर्वेक्षकांनी हे काम पूर्ण केल्याने भारतीय अचूक भौगोलिक माहितीची नोंद होऊ शकली.
जगात अशाप्रकारचे केवळ 80 दगड
भारतात केवळ नागपूर आणि पुण्यात हे दगड असून त्या व्यतिरिक्त जगात केवळ 80 ठिकाणी हे दगड आहेत. गेल्या काही वर्षांत हा दगड दुर्लक्षित झाल्यानंतर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या काळात त्याची डागडुजी करण्यात आली. या संपूर्ण प्रकल्पाचे महत्त्व आणि त्याचा पूर्वतिहास लक्षात घेता त्याचे संपूर्ण नूतनीकरण आणि सुशोभिकरण करण्यात आले आहे.