रिमझिम पावसाने गौराईचे स्वागत
भक्तिमय वातावरणात गौराईची प्राणप्रतिष्ठापना
कराड – घागर घुमू दे, घुमू दे. रामा पावा वाजु दे…, आली गवर आली, सोनपावली आली…अशा गाण्यांनी प्रफुल्लित झालेल्या वातावरणात गुरुवारी गौराईचे आगमन झाले. विघ्नहर्त्या गणपती बाप्पाच्या आगमनानंतर वेध लागून राहिलेल्या गौराईची कराडसह तालुक्यात मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. सुहासिनी एकत्र येत गौराईला सजवले.
सोमवारी बुद्धीचा देवता गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर महिला वर्गाचे लक्ष लागून राहिलेल्या गौराईचे गुरुवारी आगमन झाल्याने महिला वर्गात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गौरी पूजनासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी गेली दोन दिवसांपासून बाजारपेठेत महिलांनी मोठी गर्दी केली होती. गौरी आगमनाच्या पूर्वसंध्येला गौरीचे नाविण्यपूर्व मुखवटे महिलांना आकर्षित करत होते. या मुखवट्यांसह बाजारातून गौरीसाठी लागणाऱ्या दागिने, फळे, फुलांसह आवश्यक वस्तूंची खरेदी केल्यानंतर गुरुवारी सकाळपासूनच गौरी बसवण्याचे वेध महिलांना लागले होते. त्यामुळे या महिलांची दिवसभर लगबग दिसून आली.
दुपार नंतर गौरी आगमनासाठी ठिकाणी महिलांनी गर्दी केली होती. येथील प्रीतीसंगमावरील कृष्णा नदीवरुन गौरीचे मुखवटे व फुलोराचे पूजन करून त्यांची घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशोत्सवात गौरीपूजनाला विशेष महत्त्व असते. तीन दिवस गौरी विराजमान असतात. गुरुवारी गौरीची प्राणप्रतिष्ठा झाली असून शुक्रवारी गौरी पूजनाचा मुख्य दिवस आहे. शनिवारी दुपारनंतर गौरी विसर्जन होणार आहे. या तीन दिवसासाठी महिला वर्गांनी पंधरा दिवस आधीपासूनच तयारी केली होती.
गौरीच्या नैवेद्यासाठी शेपूची भाजी व भाकरी या नैवेद्याचा मान असतो. त्यामुळे भाज्या खरेदीसाठी देखील मंडईमध्ये दोन दिवसापासून गर्दी झाली आहे. गौराईची प्रतिष्ठापना झाल्यावर गुरुवारी गौरी समोर वेगवेगळे खाद्यपदार्थ मांडण्यात येतात. तसेच त्या रात्री गौरी जागवण्याचा कार्यक्रम होत असतो. यावेळी महिला वर्गाकडून विविध गौरीची गाणे गाऊन पारंपरिक पद्धतीचे नृत्य यावेळी केले जाते. अलीकडे ही प्रथा काळानुरूप हळूहळू कमी होऊ लागले आहे. मात्र खेडेगावात याचे प्रमाण जैसे थे आहे. गौराईच्या आगमनाने गणेशोत्सवाचा आनंद आणखी द्विगुणित झाला आहे.
येथील कृष्णाबाई मंदिराजवळ कृष्णा नदीमध्ये गौरीसाठी लागणारा फुलोरा व गौरीच्या मुखवटाचे पूजन महिला वर्गाकडून केले जाते. त्यानंतर या पूजन केलेल्या गौरींची घरोघरी प्रतिष्ठापना केली जाते. सकाळपासूनच येथील प्रीतिसंगमावर महिलांनी गर्दी केली होती. तर तालुक्यात घराजवळील तुळशीजवळ गौरीचे पूजन करून तिची प्रतिष्ठापना केली जाते. कराड शहरासह तालुक्यात दुपारी तीन नंतर मोठ्या प्रमाणावर गौरीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी रिमझिम पडणाऱ्या पावसाने गौराईचे स्वागत केले.