नवी दिल्ली – नौदलाचे प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे मिग-29 के हे विमान काल संध्याकाळी अरबी समुद्रामध्ये कोसळले. त्यानंतर या विमानाचा वैमानिक बेपत्ता झाला होता. मात्र नंतर त्याला वाचवण्यात यश आले, असे नौदलाच्या अधिकाऱ्यांनी आज सांगितले.
विमान गुरुवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अरबी समुद्रामध्ये कोसळले. त्यानंतर हवाई पहाणी केल्यावर एका वैमानिकाची सुटका केली गेली. मात्र दुसऱ्या वैमानिकाचा शोध अद्यापही सुरूच आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही दुर्घटना जेथे घडली तेथे नौदलाने टेहळणी विमाने पाठवली आहेत.
हे विमान रशियन बनावटीचे होते आणि आयएनएस विक्रमादित्यवरून विमानाने उड्डाण केले होते, असे सूत्रांनी सांगितले. या दुर्घटनेच्या उच्चस्तरिय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अलिकडेच झालेल्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या नौदलांचा सहभाग असलेल्या मलाबार युद्धसरावामध्ये आयएअएस विक्रमादित्य सामील झाले होते. भारतीय नौदलामध्ये मिग-29 के बनावटीची 40 विमाने आहेत. त्यापैकी काही विमाने नौदलाच्या विमानवाहू नौकांवर तैनात आहेत.