-माधुरी तळवलकर
अलीकडे परदेशात जाऊन राहणाऱ्या तरुणांची संख्या वाढते आहे. भारतीय कुटुंबपद्धतीत सगळेजण एकमेकांशी खूप घट्ट जोडलेले असतात. मुलं दूरदेशी गेली की, आईवडिलांना एकटं वाटू लागतं. अशाच एका निवृत्त शिक्षकाची कहाणी “एक्स्चेंज ऑफर’मध्ये दाखवली आहे.
पत्नी होती तोवर घरात फोन यायचे, येणेजाणे असायचे. तिचे निधन झाल्यावर हे शिक्षक फारच एकटे पडतात. एक जुना कॉम्प्युटर मुलाने घेऊन दिलेला असतो; त्यावर काहीतरी लिहीत बसतात. बरोबर एक समवयस्क केअरटेकर राहत असतो. तो मनमोकळा, बोलका. पण हे आता तऱ्हेवाईक, उदास झालेत. त्यात कॉम्प्युटर बंद पडतो. ते मुलाला अमेरिकेत फोन करून कॉम्प्युटर दुरुस्तीविषयी विचारतात. तो भारतातल्या कंपनीला कळवतो.
तिथून त्यांचा प्रतिनिधी घरी येतो. नवीन घ्यावा लागेल म्हणतो. ते त्यांच्या शिस्तीने त्याच्याशी कडकपणे बोलतात आणि हा खूप आदरानं त्यांच्याशी बोलत राहतो. मग तो त्यांना सांगतो की, कंपनीचा हा सोळा वर्षांपूर्वीचा पहिला कॉम्प्युटर असल्याने तो कंपनीला हवा आहे. तुम्ही फक्त पाच हजार रुपये भरलेत तर तुम्हाला पंचावन्न हजारांचा लेटेस्ट कॉम्प्युटर आम्ही देऊ. त्याला हे बरोबर वाटत नाही. तो मुलाला फोन करून विचारतो. तो म्हणतो, “हो, बरोबर आहे. एक्स्चेंज ऑफर आहे ती! मला त्यांची मेलही आलीय.’ मग हे कबूल होतात.
नवीन पीसी येतो. तो प्रतिनिधी त्यांना फेसबुक सुरू करून देतो. ह्या सरांचे विद्यार्थी आता तिशीचे आहेत. फेसबुकमुळे त्यांना आपल्या सरांचा पत्ता लागतो. त्यांच्याकडून सरांना भराभर फ्रेन्ड रिक्वेस्ट येऊ लागतात. तो प्रतिनिधी ह्यांच्या घरी येतच असतो. त्याच्या मदतीने सर सगळ्यांना होकार कळवतात. मग तो त्या सरांना वेबकॅम लावून देतो. दीड वर्षाच्या नातीला त्यांनी अजून पाहिलेलेही नसते. आता ते आपल्या कुटुंबाला वेबकॅमच्या साह्याने पाहू शकतात; समक्ष बोलू शकतात. प्रतिनिधी त्या वेळी त्यांना जन्मतारीख विचारतो. पुढच्याच आठवड्यात त्यांचा वाढदिवस असतो.
मग वाढदिवसाला अचानक त्यांचे दहा-बारा विद्यार्थी घरात गर्दी करून टाकतात. हळूहळू सर एकेकाची त्याच्या वैशिष्ट्यासह ओळख सांगतात. केक कापला जातो. नेहमीसारखा एकट्याचा वाढदिवस होत नाही. धमाल, मजा! ते धन्य होतात. तेवढ्यात तो प्रतिनिधी येतो आणि मग हेही कळते की, तो अमित कुलकर्णी नावाचा त्यांचाच विद्यार्थी असतो. कंपनीचा मालक, प्रतिनिधी नव्हे. आणि ही सगळी योजना त्याचीच असते. त्यांना म्हणतो, “आज मी जो काही आहे, ते केवळ तुमच्यामुळे!’ तिथे जमलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांची हीच भावना असते. पुढेही आणखी काही सरप्राइजेस होत जातात.