पुणे -मेट्रो सेवेचा वापर जास्तीत जास्त नागरिकांनी करावा यासाठी मेट्रो स्थानकाच्या परिसरात 2 ते 3 किलोमीटर अंतराच्या परिसरात मेट्रो फिडर बस सेवा सुरू केली जाणार आहे. ही सेवा मेट्रोचे तिकीट असलेल्या प्रवाशांना मोफत ठेवण्याबाबत प्रशासकीय पातळीवर नियोजन सुरू असून पीएमपीएमएलच्या आज (गुरुवारी) होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. या सेवेसाठी पीएमपीकडून 7 मीटर लांबीच्या सुमारे 300 ई बस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
आयुक्त कुमार म्हणाले की, शहरात मेट्रो प्रवाशांची संख्या सरासरी 40 हजारांवर गेली आहे. त्यामुळे प्रवाशांना थेट मेट्रो स्टेशनपर्यंत सलनग्नता मिळावी यासाठी वर्तुळाकार मार्गावर बस चालवण्यात येणार आहे. ही बस व्यवस्था प्रत्येक मेट्रो स्टेशनवर असणार आहे. सध्या वनाज ते रुबी हॉल आणि पिंपरी ते शिवाजीनगर, अशी मेट्रो सेवा सुरू आहे. मात्र, नवीन सेवेचे दर वेगळे ठेवण्यापेक्षा मेट्रोच्या तिकीटाच्या रकमेत हेही पैसे आकारणे अथवा मेट्रोने प्रवास करणाऱ्याला ही सेवा मोफत द्यावी. तसेच इतरांना दर आकारावा, असे नियोजन आहे. मात्र, त्यासाठीचा आर्थिक भार कोणी उचलायचा यावर या बैठकीत चर्चा होईल.
महामेट्रोला 190 कोटी देण्याचे आदेश
दरम्यान, राज्य शासनाकडून महामेट्रोला पालिकेच्या हिश्श्यापोटी 190 कोटी रुपये लवकरात लवकर देण्याचे आदेश राज्य शासनाने पालिकेस दिले आहेत. महापालिकेने या वर्षी सुमारे 40 कोटी रुपये महामेट्रोला दिले असून उर्वरित 150 कोटी रुपये पुढील चार महिन्यात टप्प्या टप्प्याने देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. या शिवाय, नळस्टॉप चौकात मेट्रोने उभारलेल्या पुलाचा खर्चही 17 कोटींनी वाढलेला असून हे पैसेही तातडीने देण्याच्या सूचना महापालिकेस करण्यात आलेल्या आहेत