पुणे – पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच ग्रामीण भागात सतत अपघात होणाऱ्या ठिकाणे ब्लॅक स्पॉट 63 आहेत. या ब्लॅक स्पॉटवर अपघातांची कारणे व त्याबाबतच्या माहितीचे शास्त्रीय विश्लेषण करुन अपघात रोखण्यासाठी तेथे करावयाच्या उपाययोजना निश्चित कराव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. यासाठी संबंधित महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच परिवहन आणि पोलीस विभागाने संयुक्त सर्वेक्षण करावे, असे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, पिंपरी चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे आदी उपस्थित होते.
या बैठकीत ‘ब्लॅक स्पॉट’ दुरुस्तीबाबत आढावा घेण्यात आला. पुणे शहरात सर्वाधिक अपघात होतात, अशी माहिती यावेळी देण्यात आली. एकात्मिक रस्ते अपघात माहिती प्रणाली अर्थात आयरॅडवरील अपघातांच्या माहितीचे विश्लेषण करून अपघातांची कारणे व त्या ठिकाणी करावयाच्या उपाययोजनांवर विचारविनिमय करावा, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
नवले पूल परिसरात अपघातात घट
नवले पूल येथील अपघात कमी करण्याच्यादृष्टीने अनेक उपाय योजल्याने अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचप्रमाणे पुणे-अहमदनगर आणि पुणे-सोलापूर मार्गावरही उपाययोजना करण्यात येत असल्याचे बांधकाम विभागाकडून यावेळी सांगण्यात आले.
तीन वर्षांत अपघातात 113 टक्क्यांनी वाढ
पुणे शहरात 2020 पासून अपघातांच्या संख्येत सुमारे 113 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यातही दुचाकी चालविणारे आणि पादचाऱ्यांचे अपघाती मृत्यूचे प्रमाण मोठे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यादृष्टीने हेल्मेटच्या वापराविषयी अधिक जनजागृती करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यावेळी म्हणाले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
- अपघात होणाऱ्या ठिकाणी रुग्णवाहिकांची स्थायी थांब्यांची ठिकाणे ठरविणे.
- रुग्णालयात लवकरात लवकर अपघातग्रस्तांना पोहोचविण्याच्यादृष्टीने आपत्कालीन वाहतूक आराखडे तयार करावे.
- अपघात रोखण्यासाठी संबंधित ठिकाणी करावयाच्या लघुकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना निश्चित कराव्यात.
- आवश्यक तेथे वेग नियंत्रणासाठी रस्त्यावर रम्बलर्स बसविणे, थर्मोप्लास्टिक रोड मार्किंग्ज, सूचना फलक, रस्त्यावरील परावर्तक, ब्लिंकर्स, रिफ्लेक्टर्स आदी उपाय योजावेत.
- ब्लॅकस्पॉटनिहाय संयुक्त सर्वेक्षण करून उपाययोजना सुचवाव्यात.
- सर्वेक्षणासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ सामाजिक संस्थांचेही सहकार्य घेण्यात यावे.