पिंपरी -पिंपरी ते फुगेवाडी या सात किलोमीटर अंतराचे काम डिसेंबर 2021 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर नव्या वर्षांत जानेवारी महिन्यात मेट्रोतून प्रवासी वाहतूक सुरू केली जाईल, अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक अतुल गाडगीळ यांनी मंगळवारी (दि.2) दिली.
फुगेवाडी येथील मेट्रो कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाव्यवस्थापक डॉ. हेमंत सोनावणे उपस्थित होते. गाडगीळ यांनी सांगितले की, पिंपरी ते स्वारगेट या रिच 1 या मार्गिकेची काम 83.2 टक्के पूर्ण झाले आहे.
संत तुकारामनगर स्टेशनचे काम पूर्ण झाले असून, फुगेवाडी स्टेशनचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित स्टेशनची कामे 50 ते 60 टक्के पूर्ण झाली आहेत. इलक्ट्रिक ओएचईचे काम 50 टक्के पूर्ण झाले आहे. रेंजहिल्स डेपोचे काम 83 टक्के पूर्ण झाले आहे.
पुणे मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यत पुणे मेट्रोचे 65 टक्के काम पूर्ण झाले असून लवकरच प्रवाशांसाठी मार्ग कार्यान्वित होणार आहेत. पुणे मेट्रो प्रकल्प डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे सांगत मेट्रोने पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विविध हरित उपक्रमाची माहिती यावेळी दिली.
सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर, पावसाचे पाणी साठवण, बायोडायजेस्टर, वृक्षारोपण, झाडांचे पुनः रोपण आणि हरित इमारती हे काही उल्लेखनीय उपक्रमांचा समावेश आहे. पुणे मेट्रोच्या मार्गिकेत येणारे एकही झाड पुणे मेट्रोने तोडलेले नाही. मेट्रोने आतापर्यंत 2 हजार 261 झाडांचे पुनर्रोपण पूर्ण केले आहे. तसेच, विविध ठिकाणी 15 हजारांहून अधिक नवीन झाडे लावली आहेत. प्रत्यारोपणानंतर 80 टक्क्यांहून अधिक झाडे जगली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.