पिंपरी – करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. अनेकवेळा अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. ऑक्सिजनसाठी वाद होत होते. भविष्यात जर तिसरी लाट आली तर पुन्हा तशी परिस्थिती ओढावू नये, या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील चार रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्लांट तयार केले आहेत. हे चारही प्लांट मिळून दर मिनिटाला सुमारे चार हजार लिटर ऑक्सिजन निर्मिती करण्यास सक्षम आहेत.
करोनाच्या काळात एप्रिल- मे महिन्यात अनेकांना ऑक्सिनज आणि बेड उपलब्ध होत नव्हते. बेड, व्हेंटिलेटर आहे, पण ऑक्सिजन नाही, अशी स्थिती त्या वेळी होती. महापालिकेच्या वायसीएमसह सर्वच रुग्णालयात त्या वेळी ऑक्सिजन बेड उपलब्ध नव्हते. उत्पादक कंपन्याकंडूनही ऑक्सिजन सिलिंडर मिळत नव्हते.
त्यामुळे भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये, म्हणून महापालिकेने स्वतःच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. ऑक्सिजन तुटवड्यावर मात करण्यासाठी महापालिकेतर्फे थेरगाव, नवीन जिजामाता, नवीन भोसरी, नवीन आकुर्डी रुग्णालयांत प्रकल्प उभारण्यात आले आहेत. संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्लांट आहे. हे चारही प्रकल्प मिळून तीन हजार 960 लिटर प्रतिमिनिट (एलपीएम) क्षमता आहे. प्रत्येक प्रकल्पासाठी एक कोटी 40 लाख रुपये खर्च आला आहे.
ऑक्सिजन निर्मिती क्षमता
थेरगाव प्लांटची ऑक्सिजन निर्मिती क्षमता एक हजार 50 लिटर प्रतिमिनिट (एलपीएम) आहे. जिजामाता, भोसरी व आकुर्डी रुग्णालयांतील प्रत्येक प्रकल्पाची क्षमता 970 एलपीएम आहे. चारही प्रकल्प मिळून तीन हजार 960 एलपीएम क्षमता आहे. प्रत्येक प्रकल्पांसाठी एक कोटी 40 लाख रुपये खर्च आला आहे.
मृत्यूदर कमी – यंत्रणा सज्ज
गेल्या काही दिवसांमध्ये करोना बाधित रुग्णांची सख्या आणि मृत्यू दर कमी झाला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता अजूनही नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिकेने बेड, ऑक्सिजन आणि मनुष्यबळासह सर्व सुविधांची तयारी करण्यात येत आहे. लहान मुलांसाठी दोन रुग्णालयांमध्ये खास बेड राखीव ठेवण्यात आले आहेत.
तिसऱ्या लाटेसाठी सज्ज – डॉ. लक्ष्मण गोफणे
या विषयी सहाय्यक आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, “”महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ऑक्सिजन प्लांटसाठी मागणी केली होती. गॅस पाईप, सिलिंडर आणि प्लांटसाठी मागणी होती. त्यानंतर ही सुविधा मिळाली आहे. त्यामुळे महापालिकेचा आरोग्य विभाग आता तिसऱ्या लाटेसाठी ऑक्सिजन प्लांटसह पूर्ण सज्ज झाला आहे.”
चारही रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. थेरगाव हॉस्पिटलमध्ये एक हजार 50 लिटर पर मिनिट (एलपीएम) क्षमता आहे. तर उर्वरित तिन्ही ठिकाणी प्रत्येकी 970 एलपीएम एवढी क्षमता आहे.
– मनोज लोणकर,
उपायुक्त, भांडार विभाग महापालिका
======================
============