पुणे- वर्षानुवर्षे मिळकतकर थकवणाऱ्यांचा दंड कमी करून मिळकतकर वसुली करण्यासाठी महापालिकेने यंदाही पुन्हा मिळकतकर अभय योजना राबवण्याचे ठरवणार आहे. घटलेल्या उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीनंतर ही योजना आणली जाण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी 50 लाखांपर्यंत थकबाकी असलेल्या मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घेतला होता. मात्र, यंदा यात वाढ करून 1 कोटी रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या करदात्यांच्या या योजनेत समावेश असण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. परिणामी, मागील योजनेप्रमाणेच यंदाही उत्पन्नात जवळपास 500 कोटींची वाढ होऊन थकबाकीदार नियमित करदाते होऊन दरवर्षी त्यांच्या कराचे उत्पन्नही वाढणार आहे.
मिळकतकराची थकबाकी 7 हजार कोटींच्या वर गेली असून, यात दरवर्षी त्यावर आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेमुळे सुमारे 24 टक्के वाढ होते. त्यामुळे ही थकबाकी जवळपास 7 हजार कोटींवर गेली आहेत. तर, हा आकडा दरवर्षी वाढतच आहे. त्यामुळे मागील वर्षी ही थकबाकी वसूल करण्यासाठी स्थायी समिती अध्यक्षांनी पुढाकार घेत 50 लाखांच्या आतील करदात्यांसाठी ही योजना राबविण्यात आली.
त्यातून महापालिकेस सुमारे 485 कोटींचा कर वसुली झाली. तर, जवळपास 250 कोटींहून अधिकच्या रकमेची सवलत द्यावी लागली. तर, या योजनेचा लाभ सुमारे 1 लाख 44 हजार करदात्यांनी घेतला होता.
त्यावेळी 1 कोटीपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या कदरात्यांकडूनही ही सवलत देण्याची मागणी केली जात होती. मात्र, स्थायी समितीकडून त्यास नकार देत या योजनेस दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाही करोनाचे संकट शहरावर ओढावले होते. त्यात आर्थिक वर्षाचे तीन ते चार महिने पुन्हा लॉकडाऊनमध्ये गेल्याने महापालिकेच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला आहे. पुन्हा अभय योजना राबविली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
दरम्यान, प्रशासकीय पातळीवर अद्याप याबाबत कोणताही प्रस्ताव तयार नसल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत असून, स्थायी समितीत त्याबाबत निर्णय झाल्यास प्रशासन अंमलबजावणी करेल असेही सांगण्यात येत आहे.