मुंबई- भारतीय कंपन्यांच्या इतिहासातील सर्वात मोठ्या विलीनीकरणाची घोषणा सोमवारी करण्यात आली. भारतातील गृह वित्त क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या एचडीएफसीचे भारतातील सर्वात मोठ्या खासगी बॅंक असलेल्या एचडीएफसी बॅंकेत विलीनीकरण होणार आहे. त्यानंतर एक नवी बलाढय कंपनी आकारास येईल.
नव्या एकत्रित कंपनीत एचडीएफसीचा वाटा 41 टक्के असणार आहे. एचडीएफसीचे ज्यांच्याकडे 25 शेअर असतील त्यांना एचडीएफसी बॅंकेचे 42 शेअर मिळणार आहेत. या विलीनीकरणास संदर्भात बोलताना एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी सांगितले की, आगामी काळात घरासाठीच्या कर्जवितरणात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. रेराची अंमलबजावणी, या क्षेत्राला मिळणारा उद्योगाचा दर्जा आणि किफायतशीर घरासाठी सरकारची पाठराखण या कारणामुळे हे क्षेत्र वेगाने विस्तारणार आहे.
एचडीएफसीचे उपाध्यक्ष केकी मिस्त्री यांनी सांगितले की यामुळे जागतिक पातळीवरील एक मोठी खासगी बॅंक आकारास येणार आहे. यामुळे एचडीएफसी बॅंकेत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना अधिक गुंतवणूक करता येऊ शकेल. हा व्यवहार पूर्ण होण्यास आर्थिक वर्ष 2024 ची तिसरी तिमाही उजाडू शकेल.
त्यामुळे एचडीएफसी बॅंकेचा घरासाठीच्या कर्जातील वाटा मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होणार आहे.
या विलीनीकरणा संदर्भात शेअर बाजारांना माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर विविध नियामक मंडळाकडून या विलीनीकरणाला परवानगी अपेक्षित आहे. एचडीएफसीचे सध्या 6.23 लाख ग्राहक आहेत. एचडीएफसी बॅंकेच्या 3 हजार शहरामध्ये 6हजार 342 शाखा आहेत. या घटनांक्रमानंतर एचडीएफसी आणि एचडीएफसी बॅंकेच्या शेअरच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ नोंदली गेली. आगामी काळातही हा शेअर तेजीत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.