मुंबई – मंगळवारी पेटीएम (Paytm) कंपनीच्या शेअरचा भाव वाढत असतानाच एचडीएफसी बँक (HDFC Bank) पेटीएमबरोबर चर्चा करीत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र ही चर्चा अतिशय प्राथमिक स्वरूपातील असून आम्ही थांबा आणि वाट पहा या भूमिकेतून या घटनाक्रमाकडे पाहत आहोत, असे एचडीएफसी बँकेचे पेमेंट विभागाचे प्रमुख पराग राव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
रिझर्व बँकेने पेटीएमवर घातलेल्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर पेटीएमया अडचणीतून बाहेर पडण्यासाठी इतर बँकाबरोबर चर्चा करीत असल्याचे बोलले जात असतानाच या चर्चेत एचडीएफसी बँक सहभागी असल्याची माहिती आता समोर आली आहे. एचडीएफसी बँकेचे पेटीएमबरोबर अनेक वर्षापासून संबंध आहेत. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी अनेक पातळ्यावर प्रयत्न चालू आहेत.
आगामी काळात या संदर्भात काय घडेल हे आम्हाला माहीत नाही आणि आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत असे ते म्हणाले. पेटीएम बँकेवर निर्बंध आल्यापासून एचडीएफसीच्या पेमेंट अॅपवरील व्यवहार वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले आणि ही एक नैसर्गिक बाब असल्याचे ते म्हणाले.