नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी त्यांना परिवार नसल्याच्या विरोधकांच्या टीकेचा जोरदार समाचार घेतला. देशातील १४० कोटी जनता माझा परिवार आहे. मेरा भारत, मेरा परिवार. माझे जीवन खुल्या पुस्तकासारखे आहे. देशातील जनतेला ते ज्ञात आहे, असे भाष्य मोदी यांनी केले.
भाजपच्या इतर नेत्यांप्रमाणेच मोदी सातत्याने विरोधकांना घराणेशाहीच्या (परिवारवाद) मुद्द्यावरून लक्ष्य करत आहेत. त्यावरून राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी रविवारी पाटण्यातील सभेत उपरोधिक टिप्पणी केली.
मोदींना स्वत:चा परिवार नसेल तर आम्ही काय करू शकतो, अशी विचारणा लालूंनी केली. त्यावरून तेलंगणातील सभेत बोलताना मोदींनी विरोधकांवर शाब्दिक प्रतिहल्ला चढवला.
देशातील जनतेची सेवा करण्याचे स्वप्न बाळगून मी अतिशय कमी वयात घर सोडले. जनतेच्या सेवेसाठी मी वचनबद्ध आहे. एखाद्या सेवकाप्रमाणे जनकल्याणासाठी मी कार्यरत आहे. मी रात्री उशीरापर्यंत कार्यरत राहत असल्याचे समजल्याने जनताच मला थोडा आरामही करण्याची विनंती करते, असे ते म्हणाले.
भ्रष्टाचार, घराणेशाहीत बुडालेले विरोधी पक्ष आता निवडणुकीसाठी खरा जाहीरनामा घेऊन आले आहेत. त्यांच्या परिवारवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर ते मोदींना परिवार नसल्याचे म्हणतात. घराणेशाहीवर आधारलेल्या पक्षांचे चेहरे वेगळे असले तरी झूठ आणि लूट हे त्यांचे चरित्र समान आहे, असे टीकास्त्रही मोदींनी सोडले.