WPL Live Cricket Score, UPW vs RCB Women’s Premier League 2024 : महिला प्रीमियर लीगचा 11 वा सामना यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. महिला प्रीमियर लीगमध्ये सोमवारी यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने होते. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा या मोसमातील शेवटचा सामना होता.
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत तीन गडी गमावून 198 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात विजयासाठी 199 धावांचा पाठलाग करताना यूपी संघाला 20 षटकात आठ बाद 175 धाव संख्येपर्यतच मजल मारता आली आणि सामना 23 धावांनी गमावावा लागला. दोन पराभवांनंतर आरसीबीचा हा पहिला विजय आणि मोसमातील तिसरा विजय आहे. यूपीची कर्णधार ॲलिसा हिलीने संघाकडून सर्वाधिक 55 धावांची खेळी केली. पण ती बाद होताच यूपीच्या विजयाच्या आशाही संपुष्टात आल्या.
तत्पूर्वी, यूपीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीने यूपीविरुद्ध 20 षटकांत तीन गडी गमावून 198 धावा केल्या. या सामन्यात सलामीला आलेल्या एस मेघना आणि स्मृती मानधना यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी झाली. आंध्र प्रदेशच्या एस मेघनाने 21 चेंडूत 28 धावा केल्या. अंजली सरवानीने तिला चामरी अटापट्टूकरवी झेलबाद केले.
त्याचवेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेली ॲलिस पेरीही मागे राहिली नाही. ऑरेंज कॅपधारी मानधनासोबत तिने दुसऱ्या विकेटसाठी 95 धावांची मोठी भागीदारी केली. मंधाना 50 चेंडूत 80 धावा करून बाद झाली. तिने खेळीत 10 चौकार अन् 3 षटकार लगावले. मंधाना हिला दिप्ती शर्मानं पूनम खेमनार हिच्याकरवी झेलबाद केलं.
यूपी वॉरियर्सविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेली एलिस पेरी जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होती. तिने 37 चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तिला सोफी एक्लेस्टोनने बाद केले. रिचा घोष 10 चेंडूत 21 धावा करून तर सोफी डिव्हाईन 2 चेंडूत 2 धावा करून नाबाद राहिली. यूपी वॉरियर्स कडून गोलंदाजीत अंजली सरवानी, दिप्ती शर्मा आणि सोफी एक्लेस्टोन यांना प्रत्येकी एक यश मिळाले.