मंचर, (प्रतिनिधी) – मासिक पाळी हे नैसर्गिक घटनाचक्र असून या काळात मुलींनी घाबरून न जाता आपल्या आईशी मुक्तपणे संवाद साधावा. असे आवाहन इनरव्हील क्लब ऑफ मंचरच्या अध्यक्षा डॉ. मेघा गाडे यांनी केले.
हुतात्मा बाबू गेणु विद्यालय व वि. ग. कापूसकर ज्युनिअर कॉलेज महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) या विद्यालयातील किशोरवयीन मुलींसाठी डिसेंट फाउंडेशन पुणे आणि इनरव्हील क्लब ऑफ मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने कळी उमलताना हे किशोरवयीन मुली वैयक्तिक स्वच्छता व जनजागृती अभियान राबविण्यात आले.
डॉ. दीप्ती साळी आणि डॉ. सुचेता शेटे यांनी मुलींना मासिक पाळीत काय काळजी घ्यावी, वैयक्तिक स्वच्छता कशी राखावी, पर्यावरण पूरक सॅनिटरी पॅडचा वापर, आहार व व्यायाम याबाबत मार्गदर्शन केले. तर डिसेंट फाउंडेशनचे सचिव फकीर आतार यांनी मुलींना मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, संचालक आदिनाथ चव्हाण, विद्यालयाचे प्राचार्य साहेबराव काळे, अक्षय सोलाट, राहुल पडवळ, राजेंद्र आवटे, जयश्री दहीतुले, शितल आवटे, अरुणा लोंढे, योगेश वाघचौरे आदी मान्यवर शिक्षक वृंद व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी 250 किशोरवयीन मुलींना दोन्ही संस्थांच्या वतीने कळी उमलताना ही मार्गदर्शक पुस्तिका व पर्यावरण पूरक सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.
कळी उमलताना या उपक्रमांतर्गत मासिक पाळी या काळात घ्यावयाची काळजी, आहार, व्यायाम, स्वच्छता व मानसिक आरोग्य या बाबत खूप चांगली माहिती मिळाली. या विषयावर खरोखर कोणीही बोलत नाही, डिसेंट फाउंडेशनचा हा उपक्रम खूप उपयोगाचा आहे.-वेदिका दत्तात्रय आवटे, विद्यार्थिनी महाळुंगे पडवळ.