गाझियाबाद – तबलिगी जमातच्या सदस्यांनी उत्तरप्रदेशच्या एका रुग्णालयातील परिचारिकांशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्याची गंभीर दखल घेत राज्य सरकारने त्या सदस्यांविरोधात कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रासुका) कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीतील तबलिगी जमातच्या समारंभाला हजेरी लावणाऱ्या अनेकांना करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे त्या समारंभाला उपस्थित राहिलेल्या अनेकांना शोधून विविध राज्यांत क्वारंटाईन केले जात आहे. उत्तरप्रदेशच्या गाझियाबादमधील रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात तबलिगीच्या 6 सदस्यांना काही दिवसांपासून ठेवण्यात आले होते. मात्र, त्या सदस्यांची गैरवर्तणूक समोर आली आहे. त्या सदस्यांनी परिचारिकांशी बोलताना आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. त्याशिवाय, अश्लील हावभावही केले.
तो प्रकार उघड झाल्यानंतर तबलिगीच्या सदस्यांना एका शैक्षणिक इमारतीमधील विलगीकरण कक्षात हलवण्यात आले. त्यांच्या गैरवर्तणुकीबद्दल उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. परिचारिकांशी गैरवर्तन करणारे मानवतेचे शत्रू आहेत. त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांविरोधातही रासुका अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय उत्तरप्रदेश सरकारने घेतला आहे.