इंदापूर -राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या इंदापूर विधानसभा मतदारसंघात, खासदार सुप्रिया सुळे यांनी गाव भेट दौऱ्या अंतर्गत गावच्या समस्या, अडचणी, गाठीभेटी बैठका, थेट गावकऱ्यांची नागरिकांशी संवाद साधला. अवसरी, गलांडवाडी, विठ्ठलवाडी, भांडगाव, बावडा या परिसरात खासदार सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांनी दिला आहे.
लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्यात सातत्याने आपली वर्दळ ठेवली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रत्येक उपक्रमात अलर्ट असल्यामुळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमाला प्रतिसाद लाभतो आहे.
तोच प्रतिसाद गुरुवारी खासदार सुप्रिया सुळे यांच्या इंदापूर तालुक्यातील दौऱ्यात गावोगावी दिसला. प्रामुख्याने प्रत्येक गावातील महिला वर्गाशी चर्चा गावातील अडचणी युवकांशी संवाद शेतकऱ्यांच्या अडचणी या गाव भेट दौऱ्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी ठेवल्यामुळे जनतेला हक्काचे दालन निर्माण झाले आहे.
अधिवेशन कालावधी सुरू असल्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे या खासदार सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यामध्ये सहभागी नव्हते; मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची इंदापूर तालुक्यातील सर्व टीम या दौऱ्यात मन ओतून काम करताना दिसली. जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, माजी सदस्य प्रतापराव पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी यांची फौज नव्या दमाने कामाला लागलेली दिसते आहे.
इंदापूरकरांच्या अपेक्षा वाढल्या
भारतीय जनता पार्टीने बारामती लोकसभा मतदारसंघ टार्गेट केला असून, यामध्ये देशपातळीवरील नेतृत्व करणारे पदाधिकारी इंदापूर तालुका व बारामती लोकसभा मतदारसंघात येत आहेत. त्यामुळे सहजरित्या सामान्य नागरिकांना केंद्रीय मंत्र्यांपर्यंत भेटता येते. आपल्या अडचणी समस्या मांडता येतात. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्येक गावात भागात लक्ष देऊन उपेक्षित समस्या मार्गी लावाव्यात, अशा अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.