पेठ (प्रतिनिधी) : सातगाव पठार( ता. आंबेगाव) भागातील सातही गावांना येथील घोडेगाव परांडा घोड नदीपात्रातून बंद पाईपलाईनद्वारे पिण्याचे पाणी देण्यासाठी सातगाव पठार भागातील ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. या योजनेसाठी 22 कोटींची तरतूद करण्यात आली, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर यांनी दिली.
या योजनेसाठी प्रथम कुरवंडी येथे पाणी आणून नंतर संपूर्ण सातगाव पठार भागातील गावांना समान दाबाने राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. एकूण बावीस कोटीची ही अत्यंत महत्वकांक्षी योजना आहे. ह्या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वापरकर्त्यासाठी नळ पाणीपुरवठा मीटर बसवला जाणार आहे. याअंतर्गत राष्ट्रीय पेयजल प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनाची मिटिंग पेठ येथे पार पडली.
जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम अंतर्गत प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना यांची बैठक पेठ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी घेण्यात आली. त्यामध्ये पाणीपुरवठा समितीची स्थापना करून अध्यक्षपदी राम तोडकर, उपाध्यक्षपदी विशाल तोत्रे, सचिव पदी ग्रामविकास अधिकारी एम.जे. चौगुले, सहसचिवपदी ग्रामसेवक अनिल टेमकर यांची निवड करण्यात आली.
सदर योजना यापुढे कशा प्रकारे कार्यान्वित होईल याची सखोल माहिती देण्यात आली. कुरवंडी येथे आवश्यक असणारी २० गुंठे जागा माजी सरपंच विशाल तोत्रे यांनी दिली. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य शीतल तोडकर, वाकेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राम तोडकर, अशोक बाजारे, सचिन पानसरे, माजी उपसरपंच संतोष धुमाळ, महेश नवले, जितेंद्र तोत्रे, विकास बारवे, अशोक राक्षे, विनायक धुमाळ, अनिल सणस, दिलीप धुमाळ, रवींद्र तोत्रे, सखाराम तोत्रे,दतात्रय तोत्रे, दिलिपराव पवळे, प्रशासक अधिकारी सागर कांबळे, तलाठी हेमंत भागवत, एम.जे. चौगुले, अनिल टेमकर, आर.व्ही. घोडेकर, एस.बी. वाळूंज, बनकर आदि मान्यवर उपस्थित होते.