निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी शेवगावात बैठक

शेवगाव  – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पुर्वतयारीसाठी येथील तहसील कार्यालयात अधिकारी, विविध पक्षाचे पदाधिकारी, निवडणूक कक्ष प्रमुख, सेक्‍टर अधिकारी यांची संयुक्त बैठक प्रांताधिकारी तथा शेवगाव विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी देवदत्त केकाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आयोजीत करण्यात आली.

यावेळी शेवगावचे तहसीलदार डॉ. विनोद भामरे, पाथर्डीचे तहसीलदार नामदेव पाटील, नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ, निवडणूक नायब तहसीलदार शिवाजी सुसरे, मयुर बेरड, सहायक पोलीस निरिक्षक सुजीत ठाकरे, पंचायत समिती, कृषी विभागाचे अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सुनील रासने, डॉ. अमोल फडके, सिध्दार्थ काटे, शीतल पुरनाळे उपस्थित होते.
केकाण यांनी मतदारसंघात मतदान प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहिते प्रमाणे कर्मचारी, अधिकारी व राजकीय पक्षांनी दक्ष रहावे असे आवाहन करून आदर्श आचार संहितेची माहिती सर्व राजकीय पक्षांना देणार आहोत. पक्ष प्रमुखांनी आपले पत्ते, मोबाईल नंबर, ई- मेल आयडी दिले तर निवडणुक काळातील विविध बैठकींची माहिती देणे सुकर होईल. मतदार याद्या तपासा. मतदान लवकर व वेळेत करण्याचे आवाहन करा यामुळे मतदानाची टक्केवारी वाढू शकते. मतदानावरील बहिष्कार टाकण्यापासून मतदारांना परावृत्त करा, अशा सूचना दिल्या.

तहसीलदार भामरे यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन होण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज आहेच, मात्र कोठे त्यांचे उल्लंघन होत असेल तर निवडणूक प्रशासनाला माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी निवडणूक विभागाची पुर्वतयारी, कायदा व सुव्यस्था, उपाययोजना, एकुण मतदार, मतदान केंद्रे, एक खिडकी योजना, विविध ऍपस, दिव्यांग मतदारांची संख्या व त्यानुसार करायचे नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली. उपस्थित कार्यकर्त्यांनी शेवगाव- पाथर्डी शहरात व्होटर स्लिप सर्वांना मिळतील असे नियोजन करावे, काही मतदार केंद्रात प्रकाश व्यवस्था करावी. तसेच बीएलओंना आवश्‍यक सुचना देण्याची मागणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.