सेवानिवृत्तांनाही मिळणार “ओळख’  

पिंपरी  – महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही आता कायमस्वरुपी ओळखपत्र देण्यात येणार आहे. सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभाकरिता कार्यालयात ये-जा करण्यासाठी, सरकारी रुग्णालयातील औषधोपचार घेणे, ज्येष्ठ नागरिक म्हणून रेल्वे, बॅंकेत उपयोग करण्यासाठी, सेवानिवृत्त सरकारी अधिकारी म्हणून समाजात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी याबाबतचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज गुरुवारी दिला आहे. खासगी ठिकाणावरुन बनवून घेतलेले ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. तसे आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे बनावट ओळखपत्रांना चाप लावण्यासाठी भांडार ऐवजी प्रशासन विभागाकडूनच ओळखपत्र दिले जाणार आहेत.

राज्य सरकारच्या प्रशासन विभागाने शासकीय सेवेत कार्यरत, सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभासाठी एका कायमस्वरुपी ओळखपत्र देण्याबाबत महापालिकेला कळविले आहे. सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या सर्व लाभांसाठी कायमस्वरुपी ओळखपत्र दाखविल्यास संबंधित कार्यालयात ये-जा करणे सोपे होईल.

निवृत्तीवेतनाबाबतची कार्यवाही मुदतीत व्हावी. सरकारी रुग्णालयातील औषधेपचार घेणे, ज्येष्ठ नागरिक म्हणून रेल्वे, बॅंकांमध्ये उपयोग करण्यासाठी त्यांना कायमस्वरुपी ओळखपत्र देण्यात येणार आहे. तसेच सरकारी सेवानिवृत्त अधिकारी म्हणून त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्याच्या दृष्टीने मदत होईल.

ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र नसतील किंवा खराब झाली असतील. अथवा पद्दोनती झाली असेल अशा अधिकारी, कर्मचा-यांनी महापालिकेकडून ओळखपत्र मिळण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज प्रशासन विभागाकडे करावा लागणार आहे. ओळखपत्र गहाळ अथवा खराब झाल्यास दुसऱ्यांदा ओळखपत्र घेण्यासाठी शुल्क द्यावे लागणार आहे. विभाग प्रमुखांच्या मान्यतेशीवाय, शिफारशीशिवाय खासगी ठिकाणीहून बनवून घेतलेले ओळखपत्र उघड झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वी महापालिकेत बनावट ओळखपत्र देण्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यामुळे भांडार विभागाऐवजी प्रशासन विभागाकडून ओळखपत्र दिले जाणार आहेत. स्मार्ट कार्ड स्वरुपात हे ओळखपत्र
असणार आहे.

ओळखपत्र नसल्यास कारवाई
सुरक्षा विभागाने ओळखपत्र पाहूनच महापालिकेत प्रवेश द्यावा. कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महापालिका कार्यालयात प्रवेश करताना ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे. ओळखपत्र न लावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश विभाग प्रमुखांना देण्यात आले आहेत. महापालिकेतील प्रशिक्षणार्थी, मानधनावरील कर्मचाऱ्यांना त्यांच्या नेमणूक कालावधीपुरतेच व विहीत शुल्क आकारुन ओळखपत्र दिले जाणार आहे. नेमणूक कालावधी पुर्ण झाल्यानंतर ओळखपत्र जमा करुन घेण्यात येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)