मेढा – उन्हाच्या झळा तीव्र होत असतानाच मेढावासीयांना पाणी पुरवठा बंद पडल्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. मेढा नगरपंचायततर्फे शहरपरिसरात करण्यात येणार पाणीपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून पूर्णपणे बंद आहे. यामागे मोटर नादुरुस्त असल्याचे कारण देण्यात येत आहे. यामुळे मेढावासियांवर ऐन उन्हात पाण्यासाठी वनवन करण्याची वेळ आली आहे.
याप्रकरणी, एकीकडे नगरपंचायतीचे प्रशासक तांत्रिक कारण पुढे करत असून माजी लोकप्रतिनिधी प्रशासक-राज असल्याकडे बोट दाखवत असल्याचे मेढावासीयांनी सांगितले.
पाणीपुरवठा शुद्धीकरण प्रकल्पाच्या देखभालीवर मोठा खर्च
मेढा नगपंचायतने पाणीपुरवठा शुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला असल्याची माहिती आहे. देखभालीवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत असताना देखील पाणीपुरवठा योजना ऐन उन्हाळ्यात बारगळली असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.