‘एमसीए’ सीईटीचा निकाल जाहीर

384 विद्यार्थ्यांना शून्य आणि त्यापेक्षा कमी गुण

पुणे – राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2019-20 यासाठी “एमसीए’ या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटीचा निकाल जाहीर झाला असून, त्यात तब्बल 384 विद्यार्थ्यांना शून्य आणि त्यापेक्षा कमी गुण मिळाल्याचे स्पष्ट करण्यात आले.

एमसीए सीईटीची परीक्षा 24 मार्च रोजी घेण्यात आली होती. ही परीक्षा महाराष्ट्रातील 53 केंद्रावर व महाराष्ट्र राज्यबाहेरील 11 केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या सीईटीसाठी 14 हजार 166 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 13 हजार 458 विद्यार्थी परीक्षेला बसले. या परीक्षेचा ऑनलाइन निकाल 12 एप्रिल रोजी जाहीर झाला. मात्र विद्यार्थ्यांना सीईटीत मिळालेल्या गुणांचा तक्‍ता राज्य सामाईक प्रवेश परीक्षाने सोमवारी जाहीर केला.

एमसीए सीईटी ही निगेटिव्ह पद्धतीनुसार घेण्यात आली. त्यामुळे उत्तरे चुकीचे नोंदविल्यास, त्यांचे गुण कमी होतात. या परीक्षेत 384 विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले असून, त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांना शून्यपेक्षा कमी अर्थात वजामध्ये गुण प्राप्त झाले आहेत. शेवटच्या विद्यार्थ्यांना वजा 25 गुण मिळाल्याचे आकडीवरून स्पष्ट होत आहे. एवढे नव्हे, तर 10 हजार विद्यार्थ्यांना 1 ते 50 या दरम्यान गुण मिळाले आहेत, अशी माहिती कक्षाचे आयुक्‍त आनंद रायते यांनी पत्रकाद्वारे दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.