अहमदाबाद, दि. 26 – संपूर्ण गुजरात राज्यातही कोविडचे पेशंट मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने तेथे आता डॉक्टरांची कमतरता भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी बॉंडवरील एमबीबीएसच्या सर्व विद्यार्थ्यांना कोविड ड्युटीवर जॉईन होण्याचा आदेश देण्यात आला आहे. साथ रोग नियंत्रण कायद्या अंतर्गत हा आदेश काढण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना तातडीने कामावर रूजू होण्याचा आदेश देण्यात आला असून त्यात कुचराई करणाऱ्या विद्यार्थ्यावर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य आयुक्त जय प्रकाश शिवहारे यांनी दिली आहे.
सध्याची रुग्ण संख्या लक्षात घेऊन सर्व सरकारी हॉस्पिटलमधील बेड्स वाढवण्यात येत आहेत. तथापि बेड्सची संख्या वाढवली तरी त्या प्रमाणात वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नाहीत ही समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याने ही उपाययोजना करण्यात आली आहे. या योजनेनुसार 1 हजार वैद्यकीय विद्यार्थ्यांची विविध रुग्णालयांमध्ये नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना क्लास 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांचा दर्जा दिला जाणार आहे.
जे विद्यार्थी आपल्या नियोजित रुग्णालयात दाखल झालेले नाहींत त्यांच्यावर साथ रोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्याचा आदेश महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. गुजरातमध्ये रविवारी एकाच दिवशी करोनाचे 14 हजार 296 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या राज्यातील एकूण रुग्ण संख्या आता सुमारे पाच लाख इतकी झाली आहे.