पुणे – एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए/एमएमएस पदव्युत्तरच्या सीईटी परीक्षेचा निकाल राज्य सीईटी सेलने आज सकाळी जाहीर केला. या सीईटीत शशांक प्रभू हा विद्यार्थी 159 गुण मिळवून राज्यात प्रथम आला आहे. या परीक्षेत केवळ चार विद्यार्थ्यांना 200 पैकी 150 हून अधिक गुण मिळाले आहेत.
“एमबीए’ प्रवेशासाठी 14 आणि 15 मार्च रोजी सीईटी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून 1 लाख 24 हजार 236 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 1 लाख 10 हजार 661 विद्यार्थ्यांनी राज्यातील 135 व राज्याबाहेरील 13 केंद्रावर परीक्षा दिली होती. त्याचा निकाल आज ऑनलाईनद्वारे राज्य सीईटी सेलने जाहीर केला. यात 51 ते 100 पर्यंत गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. दुसरा क्रमांकावर असलेल्या अजित ठक्करला 155 गुण, तर 153 गुण मिळवून आकांशा श्रीवास्तव तिसरा क्रमांक मिळविली आहे.