वेल्हे -वेल्हे तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या वतीने तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी “माझे आंगण माझे रणांगण’ आंदोलन “कोविड-19’चे सर्व नियम पाळून आणि स्थानिक प्रशासनाला कोणत्याही प्रकारे वेठीस न धरता करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोविड 19 परिस्थिती हाताळण्यासाठी अपयशी ठरलेल्या महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या विरोधात हे आंदोलन असल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले.
श्रमिकांना, कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना, छोट्या व्यावसायिकांना, रिक्षावाल्यांना, बारा बलुतेदारांना राज्य सरकारने पॅकेज घोषित करावे आणि करोनाच्या विरोधामध्ये योग्य आणि सुसूत्रपद्धतीने लढा द्यावा, यासाठी माझे अंगण माझे रणांगण हे निषेध आंदोलन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत करण्यात आले.
भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, पश्चिम महाराष्ट्र संघटन महामंत्री रवी अनासपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाचे नियोजन भाजपा वेल्हे तालुका अध्यक्ष सुनील जागडे यांनी केले होते. यावेळी वेल्हे तालुका महिला अध्यक्ष सुषमा जागडे, मंगेश कुंभार, सुनील तिडके, अनिल राऊत, किसनराव तिडके उपस्थित होते.