सोलापूर: पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना सोलापूर उत्तर विधानसभेसाठी भाजपची उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढविणार, असे म्हणत सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी यांनी बंड पुकारले आहे. सोमवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा संपल्यानंतर त्यांनी निवडणूक लढवणार असल्याचा पुनरुच्चार केला.
विद्यमान आमदार तथा पालकमंत्री विजय देशमुख यांनी सलग तीन वेळा शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. विधानसभा 2014 मध्ये त्यांनी विक्रमी मते मिळवली होती. सध्याच्या तिसऱ्या टर्ममध्ये त्यांनी लोकोपयोगी अपेक्षित कामे केली नाहीत. त्यामुळे यंदाच्या विधानसभेच्या टर्मला पालकमंत्र्यांना उमेदवारी दिल्यास विरोधात निवडणूक लढवू, असे शोभा बनशेट्टी सांगितले. उत्तर मतदारसंघातून ऍड. मिलिंद थोबडे हेही इच्छुक आहेत. त्यांना उमेदवारी दिल्यास भाजपचे काम करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंधरा वर्षांत पालकमंत्र्यांनी काहीच ठोस काम केले नाही. त्यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी देऊ नये. पालकमंत्र्यांना सोडून इतर कोणालाही उमेदवारी द्यावी, आम्ही पक्षाचे काम करू. मात्र त्यांनाच उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल करू, असे बनशेट्टी म्हणाल्या.
सहकारमंत्र्यांच्या कट्टर समर्थक
महापौर बनशेट्टी या सहकारमंत्र्यांच्या कट्टर समर्थक आहेत. त्याचसोबत अक्कलकोटमधून त्यांना रसद मिळू शकते. त्यामुळे आजच्या अपक्ष उमेदवारीतून बंडाची घोषणा करण्यामागे पालकमंत्री व सहकारमंत्री “स्नेहसंबंध’ असल्याचे मत कट्टर भाजप समर्थक व्यक्त करत आहेत. यानिमित्ताने उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये नव्याने विविध चर्चेला सुरुवात झाल्याचे मत राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.