क्रिकेट काॅर्नर( #IPL ) : ‘आयपीएल’मधील महिलाराज

-अमित डोंगरे

स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा कित्येक क्षेत्रात मारल्या जातात. मात्र, जेव्हा संधी देण्याची वेळ येते तेव्हा त्यांचा प्रकर्षाने विचार केला जात नाही, असेही दिसून येते. यंदाची आयपीएल स्पर्धा मात्र, त्याला अपवाद ठरेल. स्पर्धेच्या पहिल्या मोसमापासून गेल्या वर्षीपर्यंत प्रसिद्ध अँकर मयांती लॅंगर जगभरात नावाजली गेली. यंदा तिचा सहभाग नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्‍त केली असली तरी यंदाच्या स्पर्धेत महिलांची संख्या पाहता स्पर्धेत जणू महिलाराज आल्याचे चित्र दिसत आहे.

मयांतीला का वगळले असा प्रश्‍नही विचारला जात होता. मात्र, तिने जगभरातील आपल्या चाहत्यांना  एक गुडन्युज आहे, असे सांगितले व लगेचच आई बनल्याचीही बातमी दिली. मयांतीने एका बाळाला जन्म दिला असून त्यासाठी तिने परमेश्‍वराचे आभार मानले आहेत. हेच कारण होते तिच्या यंदाच्या स्पर्धेतील अनुपस्थितीचे.

स्टार समूहाने यंदा बॉलीवडूमधील काही नव्या अभिनेत्रींना पसंती दिली आहे. अँकरींग तसेच अन्य कार्यक्रमांसाठी सुरेन सुंदरम, किरा नारायणन, सुहेल चंदोक, नशप्रीत कौर, संजना गणेशन, जतीन सप्रू, तान्या पुरोहित, अनंत त्यागी, धीरज जुनेजा, भावना बालाकृष्णन, रिना डिसूजा, मधू मालंकोडी, नेहा माचा या नवोदित अँकर तसेच अभिनेत्रींसह भारताची माजी आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू अंजुम चोप्रा, भारतीय वंशाची ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू लिसा स्थळेकर व नीराली मिडोस यांना नियुक्‍त केले.

यंदाच्या स्पर्धेत प्रथमच इतक्‍या मोठ्या संख्येने महिलांना संधी देण्यात आली आहे. यातील अनेक जणींनी विविध स्पर्धांचे निवेदन केले आहे तर किरा, तान्या यांनी नाटक व चित्रपटांतून भूमिकाही केल्या आहेत. तान्या अनुष्का शर्मासह हायवे 10 या चित्रपटातही दिसली होती. नशप्रीत तर प्रसिद्ध मॉडेल आहे.

प्रसिद्ध माजी कसोटीपटू रॉजर बिन्नी यांचा मुलगा व माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नी याच्याशी मयांतीने 2012 साली विवाह केला. आता मयांतीने एका मुलाला जन्म दिला असून सुपरमॉम बनलेली मयांती पुढील आयपीएलमध्ये दिसणार असल्याचेही निश्‍चित मानले जात आहे. मयांतीने केवळ क्रिकेटच नव्हे तर फुटबॉलसह विविध स्पर्धांचेही निवेदन केले आहे.

यंदाची स्पर्धा करोनामुळे अमिरातीत होत असली तरी त्यातील महिलांचा सहभाग निश्‍चितच चर्चिला जात आहे. येत्या काळात महिलांचीही आयपीएल स्पर्धा सुरू होणार असून त्याद्वारे खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेटमध्येही महिलाराज यावे अशीच अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.