मावळचे खाते उघडले, एक उमेदवारी अर्ज दाखल

-34 उमेदवारी अर्जांची विक्रीः प्रमुख उमेदवार साधणार पाडव्यानंतरचा मुहूर्त?
-तिसऱ्या दिवशी आला “पहिला’ अर्ज

अमावस्येचे सावट

स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी कोणतेही मुख्य उमेदवार अर्ज भरणार नाहीत. पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रातील राजकीय मंडळी अजूनही अमावस्या, पौर्णिमा आणि पंचांग पाहूनच महत्त्वाची कामे करत आहेत. शुक्रवारी अमावस्या असल्यामुळे उमेदवार अर्ज भरणार नाहीत, असे स्थानिक कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यांनतर शनिवारी गुढीपाडवा व रविवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने दोन दिवस उमेदवारी अर्ज भरता येणार नाहीत. त्यामुळे सोमवार व मंगळवारी शेवटच्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी होऊ शकते. अद्याप प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी आपला अर्ज सादर केलेला नसल्याने शेवटच्या दोन दिवसात प्रमुख उमेदवार अर्ज सादर करतील अशी शक्‍यता आहे. बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारांनी देखील आपण सोमवारी अर्ज भरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

पिंपरी – मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी 2 एप्रिल पासून सुरू झाला असला तरी सुरुवातीचे दोन दिवस एकाही इच्छुकाने अर्ज भरला नव्हता. गुरुवारी एका अपक्ष उमेदवाराने अर्ज भरुन मावळचे खाते उघडले आहे. अद्याप उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक “महुर्ताचा’ शोध घेत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. गुरुवार दि. 4 एप्रिल पर्यंत 34 उमेदवारी अर्जाची व्रिकी झालेली आहे. आज गुरुवार दि. 4 एप्रिल रोजी केवळ एका उमेदवाराने अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. आता, प्रमुख उमेदवार “गुढीपाडव्या’नंतरच शुभ महुर्तावर अर्ज भरतील अशी शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष कामकाजाला 2 एप्रिल पासून सुरवात झाली आहे. 2 एप्रिल रोजी अधिसूचना प्रसिध्द झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशीपासूनच इच्छुक उमेदवार व त्यांचे समर्थक आपल्या उमेदवारांसाठी अर्ज विकत घेऊन जात आहेत. गुरवार दि. 4 एप्रिल पर्यंत 34 उमेदवारी अर्जाची विक्री झाली आहे. अनेक इच्छुकांनी 2 ते 3 उमेदवारी अर्जाची खरेदी केली आहे.

उमेदवारी अर्जाची विक्री झालेली असली तरी अद्याप इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्याचा महुर्त सापडला नसल्याने तिसऱ्या दिवसापर्यंत तरी अपेक्षित उमेदवारांनी आपले अर्ज भरलेले नव्हते. गुरुवारी दि. 4 रोजी नवनाथ विश्‍वनाथ दुधाळ यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. ते मावळसाठी उमदेवारी अर्ज भरणारे पहिले उमेदवार ठरले आहेत. गुढीपाडव्यानंतरच शुभ महुर्तावर उमेदवार अर्ज भरतील अशी शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.