64 हजार तरुण करणार पहिल्यांदाच मतदान

नवमतदारांची संख्या वाढली : तरुणाईंचा कौल कोणाला?

पिंपरी – जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव म्हणजे अर्थातच लोकसभा निवडणुका. दर निवडणुकांमध्ये एक नवीन पिढी तरुणांचे प्रतिनिधित्व करत मताधिकाराचा प्रयोग करत असते. मावळ लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवीन मतदारांची संख्येत लक्षणीय वाढली आहे. या निवडणुकीत 64 हजार 413 नविन मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.

मावळ, कर्जत आणि चिंचवड मतदार संघांमध्ये पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवीन मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.
युवा मतदार मोठ्या प्रमाणात असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी युवा मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केले आहेत. अत्यंत चुरशीच्या होत असलेल्या लढाईत “मावळ’ चा खासदार निवडवण्यात तरुण मतदार मोठी भूमिका बजावणार हे निश्‍चित. मावळच्या उमदेवारांचे भवितव्य या नवमतदारांच्या हाती राहणार आहे. नवीन मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार हे 23 मे ला जरी कळणार असले तर विजय आणि पराजय ठरवण्याची क्षमता या नवमतदारांमध्ये आहे. यामुळे सर्वच उमेदवार सध्या या नवमतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात मावळ लोकसभा मतदार संघ हा येथील घडामोडी आणि उमेदवारांमुळे राज्यभरातच नव्हे तर देशात देखील चर्चेचा विषय बनला आहे.

नव मतदार तसेच तरुण वर्ग हा या मतदार संघात मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच सोशल मीडियाच्या या युगात तरुणाईचा कलच बरेच काही निश्‍चित करत असल्याने प्रत्येक पक्षाला आता ही तरुणाई हवी-हवीशी झाली आहे. यामुळे सध्या सर्वच उमदेवार या नवमतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत युवा मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करुन करुन सत्तेची सूत्रे आपल्याही हातात आहेत हे राजकीय लोकांना दाखवून दिले होते.

मागील लोकसभा निवडणुकीप्रमाणेच या लोकसभा निवडणुकीतही पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांची संख्या सर्वच मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे हे नवमतदार आपले मत कोणाच्या पारड्यात टाकणार यावरच अनेक उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातही नवमतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात यावेळी तब्बल 64 हजार 413 मतदार पहिल्यांदाच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या नवीन मतदारांची संख्या पाहिल्यांनतर यावेळी मावळचा खासदार युवा मतदारच ठरवणार हे निश्‍चित आहे. त्यामुळे या निवडणुकीत हे नवीन मतदार आपला कौल कोणाच्या पारड्यात टाकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

11 हजार 500 मतदारांची नावे वगळली

मतदार यादीत 2 ठिकाणी नाव असने, वेगवेगळ्या मतदारसंघात दोन वेळा नाव असणाऱ्या अनेक मतदारांची नावे मतदान यादीतून वगळण्यात आली आहेत. मावळ लोकसभेमध्येही 11 हजार 517 मतदारांचे नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. यामध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये 1 हजार 610, कर्जत 3 हजार 544, उरण 2 हजार 950, मावळ 962, चिंचवड 2 हजार 348 व पिंपरी विधानसभा मतदारसंघातून 157 मतदारांचे नाव कमी करण्यात आली आहेत.

मावळमध्ये सर्वाधिक नवीन मतदार

मावळ लोकसभा मतदारसंघामधील सहाही विधासभा मतदार संघामध्ये नवमतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये 5 हजार 899 नवीन मतदारांची नोंद झाली आहे. तर कर्जतमध्ये 13 हजार 938, उरणमध्ये 11 हजार 127, मावळमध्ये 16 हजार 409, चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये 11 हजार 859 व पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये 5 हजार 181 नविन मतदारांची नोंद करण्यात आली आहे. मावळ, कर्जत आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये नवमतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.