सातारा – सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर बारकाईने नजर ठेवणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी सायंकाळपासून आठ विधानसभा मतदारसंघांमधील घडामोडींचा आढावा घेतला. पक्षाच्या उमेदवारांची कमराबंद बैठक घेऊन पवारांनी त्यांना बळ दिले. शरद पवार यांनी विधानसभा निवडणूक व सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी “मास्टर प्लॅनिंग’ केले आहे.
सातारा जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची आहे. राजघराण्यातील नेत्यांनी ऐनवेळी साथ सोडल्याने राष्ट्रवादी घायाळ झाली असली तरी शरद पवारांनी सभा घेऊन राष्ट्रवादीत चैतन्य निर्माण केले आहे. साताऱ्यात गुरुवारी सायंकाळी दाखल झाल्यानंतर शरद पवारांनी हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्हमध्ये मुक्काम केला. जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरताना केलेल्या शक्तिप्रदर्शनाचा आढावाही त्यांनी घेतला. अनेकांच्या गाठीभेटीसुद्धा घेतल्या. “आमचं ठरलंय’ टीममधून बाहेर पडलेल्या प्रभाकर देशमुख यांच्याशी पवारांनी वीस मिनिटे चर्चा करून माण-खटावमधील राजकीय स्थितीचा अंदाज घेतला. साताऱ्यात अर्ज भरलेले दीपक पवार, श्रीनिवास पाटील यांनीसुध्दा शरद पवार यांची भेट घेतली.
अनौपचारिक गाठीभेटी व बैठकांनंतर पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांची पुन्हा स्वतंत्र बैठक घेतली. आ. शशिकांत शिंदे, प्रभाकर घार्गे, विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर देशमुख, बाळासाहेब सोळसकर, सुभाष शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सुधीर धुमाळ, सुरेंद्र गुदगे उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात शरद पवारांच्या पाच सभांचे नियोजन करण्याचा निर्णय गुरुवारी रात्री उशिरा झाल्याचे समजते. माण-खटावच्या आखाड्यात राष्ट्रवादीकडून प्रभाकर देशमुख यांना अधिकृत उमेदवारी निश्चित करण्यात आली. रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वीही पवारांनी शुक्रवारी सकाळी राजकीय खलबते केली.
सातारा लोकसभा व विधानसभा मतदारसंघांवर विशेषत्वाने लक्ष ठेऊन राष्ट्रवादीकडून कडवी टक्कर देण्यासाठी व्यूहरचना केल्याचे समजते. कोरेगावच्या राजकारणातील सध्याच्या हालचालींची माहिती पवारांनी आ. शशिकांत शिंदे यांच्याकडून घेतली. रयतचा कार्यक्रम झाल्यानंतर ते कोरेगावात दाखल झाले. तेथे आ. शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीतही ते सहभागी झाले. त्यानंतर ते कोल्हापूरला रवाना झाले. या वयातही पवारांच्या कामाचा झपाटा व कुशल राजनीतीने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना पुन्हा “चार्ज केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेसुद्धा कोरेगावमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असल्याचे सांगण्यात आले. तेथे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार महेश शिंदे आणि भाजपमधून बंडखोरी केलेल्या किशोर बाचल यांच्यामुळे होणाऱ्या मतविभागणीचा फायदा उचलण्याची राष्ट्रवादीची रणनीती आहे.