माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुखही निवडणूक रिंगणात

ढोल-ताशाचा दणदणाट, हलगीचा कडकडाट, फटाक्‍यांची आतषबाजी व तरुणाईच्या जल्लोषात “माण-खटाव, गोरे हटाव’चा नारा देत जोरदार रॅली काढण्यात आली. त्यानंतर या टीममधून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, रणजित देशमुख, अनिल देसाई या युवा नेत्यांनी मोठ्या शक्‍तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे व युवा नेते डॉ. संदीप पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

“आमचं ठरलयं’ टीमकडून अनिल देसाई, राष्ट्रवादीकडून प्रभाकर देशमुख तर अपक्ष रणजित देशमुख हे शक्‍तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरणार होते. मात्र, दुपारी एकच्या सुमारास वेगवान घडामोडी घडल्या आणि पुन्हा एकदा “आमचं ठरलयं’ची सर्व टीम एकत्रित आली. दोन वेगवेगळ्या रॅलीऐवजी एकत्रित एकच रॅली काढण्याचा निर्णय झाला.

एका बैलगाडीत उमेदवार प्रभाकर देशमुख, अनिल देसाई व रणजित देशमुख यांच्यासह डॉ. येळगावकर, प्रभाकर घार्गे, सुरेंद्र गुदगे व डॉ. संदीप पोळ होते. दुसऱ्या बैलगाडीत इतर मान्यवर होते. दोन्ही बैलगाड्यांपुढे उघड्या जीपमध्ये कार्यकर्ते होते. “आमचं ठरलंय’च्या व “आपला माणूस’च्या टोप्या लक्ष वेधत होत्या.

… तर दोघांना अर्ज माघारी घ्यावे लागतील
आज तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी या तिघांपैकी एकच “आमचं ठरलंय’चा उमेदवार असेल, असा विश्‍वास डॉ. येळगावकर, घार्गे व गुदगे यांनी कार्यकर्त्यांना दिला. त्यामुळे अर्ज भरलेल्या उमेदवारांपैकी दोघांना अर्ज माघारी घ्यावे लागतील, असे स्पष्ट झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.