पिंपरी – पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 35 उमेदवारांनी 51 अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने नगरसेविका सुलक्षणा शीलवंत-धर यांना दिलेली उमेदवारी आयत्या वेळी रद्द करीत माजी आमदार अण्णा बनसोडे यांना शनिवारी उमेदवारी दिली. दरम्यान, पक्षाकडून दोन उमेदवारांना एबी फॉर्म मिळाल्याने पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण हा गोंधळ निर्माण झाला आहे. तर महायुतीमधील बंडखोरी आजही कायम राहिली असून भाजपाचे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, माजी नगरसेवक भीमा बोबडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अण्णा बनसोडे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीच्या वतीने प्राधिकरणातील हेडगेवार भवन येथे पिंपरी विधानसभा निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल केला. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. मात्र, त्यांना राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म मिळाला. त्यांनी निवडणूक कार्यालयात जाऊन प्रथम अर्ज भरला. त्यानंतर सुलक्षणा शिलवंत-धर यांनी अर्ज व सोबत राष्ट्रवादीचा एबी फॉर्म भरला. तसेच, अपक्ष म्हणूनही त्यांनी दुसरा अर्ज दिला आहे. मीना खिलारे यांनी देखील राष्ट्रवादीतर्फे अर्ज भरला आहे. प्रवीण गायकवाड (वंचित बहुजन आघाडी), किसन कांबळे (मनसे), धनराज गायकवाड (बहुजन समाज पार्टी) यांनी पक्षातर्फे तर, शेखर ओव्हाळ, भीमा बोबडे, उत्तम हिरवे, चंद्रकांत माने, युवराज दाखले आदींनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. महायुतीतून बंडखोरी करीत अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, रिपाईंच्या (आठवले गट) चंद्रकांता सोनकांबळे, भाजपाचे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी अपक्ष अर्ज भरून ऍड. चाबुकस्वार यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. तर, कॉंग्रेस आणि अपक्ष असे दोन अर्ज सुंदर कांबळे यांनी भरले आहेत. विजय रंदिल (अपक्ष) यांनीही उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्जांची शनिवारी छाननी होणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून मी पक्षाचे काम करीत आहे. राष्ट्रवादीने मला नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्षपद, दोनदा विधानसभेची उमेदवारी दिली. मागील विधानसभेत भाजपाची लाट असतानाही मी पिंपरीमध्ये फार थोड्या मतांनी पराभूत झालो होतो. त्यातून खचून न जाता मी पुन्हा नव्या उमेदीने पक्षाचे काम सुरू ठेवले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यावर पुन्हा विश्वास व्यक्त करून मला पिंपरी विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी दिली आहे.
– अण्णा बनसोडे, माजी आमदारराष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मला उमेदवारी द्यायचीच नव्हती तर तसे मला सांगायचे होते. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी मला स्वत: येऊन एबी फॉर्म दिला होता. अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याची भूमिका अण्णा बनसोडे यांनी मांडल्यानंतर “लॉबींग’ करून माझे तिकीट कापण्यात आले. महिला प्रतिनिधीला डावलण्यासाठी कुरघोडीचे राजकारण केले. बनसोडे यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढवून दाखवायची होती.
– सुलक्षणा शिलवंत-धर, नगरसेविका