नवी दिल्ली – वेगाने पसरणाऱ्या करोनाच्या ओमायक्रॉन आवृत्तीमुळे निर्माण झालेली परिस्थिती सामान्य करण्यासाठी मास्कचा आणि सोशल डिस्टन्सिंग यांचा प्रभावी वापर होत असल्याची खातरजमा करा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केल्या. दरम्यान दिवसांत एक लाख 59 हजार बाधितांची देशात नोंद झाली.
करोनाच्या स्थितीला उच्चस्तरीय आढावा आज पंतप्रधानांनी घेतला. लक्षणे नसणाऱ्या आणि सौम्य लक्षणे असणाऱ्या संसर्गितांचे काटेकोर गृहविलगीकरणाकडे लक्ष द्यावे. समाजात वस्तुस्थितीची माहिती द्या, असेही आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.
राज्यांशी समन्वय ठेवण्याच्या सूचना केंद्रातील अधिकाऱ्यांना देत पंतप्रधान म्हणाले, व्यापक प्रतिबंधात्मक क्षेत्र आणि व्यापक सर्वेक्षण या उपाययोजना क्लस्टर क्षेत्रात कराव्यात. आरोग्य आणि आघाडीच्या योध्द्यांना काळजीसाठी डोस मिळण्याची व्यवस्था करा. त्याचबरोबर 15 ते 17 वयोगटातील लसीकरण मिशन म्हणून हातात घ्या.
अवघ्या सात दिवसांत 15 ते 18 वयोगटातील किशोरांचे 31 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे यावर त्यांनी बैठकीत प्रकाशझोत टाकला. चाचण्यांमधील शास्त्रीय संसोधन, लस यासह विषाणूमध्ये होणाऱ्या उत्परीवर्तनावरही पंतप्रधानांनी भाष्य केले.
सध्याच्या करोना रुग्णांची संख्या हाताळताना करोना नसणाऱ्यांच्या आरोग्य सेवेची खातरजमा करा. दुर्गम आणि ग्रामीण भागात आरोग्य सुविधा मिळण्यासाठी टेलीमेडिसीनचा वापर करा, असेही मोदी यांनी सांगितले.
आपल्या भाषणादरम्यान त्यांनी सध्याच्या रुग्णवाढीसंदर्भात एक प्रझेंटेशनही केले. ही साथ शिखरावर पोहोचेल त्यावेळी असणाऱ्या वेगवेगळ्या अंदाजांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय, यांसह परराष्ट्र सचिव, गृहसचिव, मंत्रीमंडळ सचिव आणि रेल्वे मंडळाचे अध्यक्षही उपस्थित होते.
दिवसांत दीड लाख बाधित
रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार एकाच दिवसांत एक लाख 59 हजार बाधित निघाले. ही गेल्या 224 दिवसांतील सर्वोच्च संख्या आहे. सक्रियबाधित संख्या पाच लाख 90 हजार 611 आहे ही 197 दिवसांतील सर्वोच्च संख्या आहे. गेल्यावर्षी 29 मेला यापुर्वी एक लाख 65 हजार 553 संसर्गित नोंदवले होते ती त्या लाटेतील सर्वोच्च संख्या होती.