मुंबई – दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपुत संबंधीत ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने दोन आरोपींचे बॅंक खाते गोठवली होती. ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल विशेष न्यायालयाने दिला आहे. तसेच संबंधित बॅंक खाती पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणी आरोपी जय मधोक आणि झैद विलात्रा यांनी विशेष न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकेत मधोक यांनी नमूद केले की, त्यांची दोन बॅंक खाती असून ती गतवर्षी ऑक्टोबरमध्ये सील करण्यात आली. या कथित गुन्ह्याशी संबंधित बॅंक खात्यांमध्ये कोणतीही रक्कम असल्याचा कोणताही आरोप नाही. तसेच तपास अधिकाऱ्यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 102 नुसार माहिती दिली नसल्याचा दावा केला.
या याचिकेला एनसीबीच्या विशेष सरकारी वकीलांनी विरोध केला. तसेच या प्रकरणाचा अद्याप तपास सुरू असल्याचे न्यायालयात सांगितले.
हा युक्तीवाद फेटाळत न्यायालयाने म्हटले की, सीआरपीसीनुसार पोलीस अधिकाऱ्याने दंडाधिकाऱ्यांकडे जप्तीची तक्रार करणे आवश्यक आहे. अशा अहवालाच्या अनुपस्थितीत, तपास अधिकाऱ्याचे हे कृत्य बेकायदेशीर असल्याचे मानले जाते. यामुळे संबंधीत सील केलेली बॅंक खाती पुन्हा सुरू करण्यात यावेत, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. बी. माने यांनी आदेशात म्हटले आहे.