नगर -करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आता सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तसे आदेश काढले आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यास संबंधित प्राधिकरणाने दंडासह शिक्षा करावी, असेही या आदेशात स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यामध्ये करोनाचे आतापर्यंत 27 रुग्ण आढळले आहेत. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाच्या अनुषंगाने सार्वजनिक, कामाच्या, उत्पादक आस्थापनेच्या ठिकाणी कोणत्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला आहे. त्यानुसार सर्व सार्वजनिक, कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य आहे. सार्वजनिक ठिकाणे, कामाची ठिकाणे आणि वाहतुकीच्या ठिकाणांचे प्रभारी यांनी त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन होईल, यासाठी दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही संघटनेने, व्यवस्थापकाने पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमण्याची परवानगी देऊ नये. विवाह व अंत्यसंस्कार याठिकाणी गर्दी जमणार नाही.
याबाबत नियमन करावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यास संबंधित प्राधिकरणाने दंडासह शिक्षा करावी. दारू, गुटखा, तंबाखू इत्यादींच्या विक्रीवर बंदी असल्याने त्याचे सक्तीने पालन करावे व सार्वजनिक ठिकाणी कोणीही थुंकू नये, याची दक्षता घ्यावी, असेही या आदेशात म्हटले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्व कामाच्या ठिकाणी तापमान तपासणीसाठी पुरेशी व्यवस्था करावी व सॅनिटायझर पुरवावेत, हात धुण्याच्या ठिकाणांची संख्या वाढवावी, कामाच्या ठिकाणी शिफ्टदरम्यान तासाभराचे अंतर ठेवावे, तसेच कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या वेळा ठरवून द्याव्यात, जेणेकरून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल. 65 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती व 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या पालकांना घरून काम करण्यास प्रोत्साहित करावे. सर्व खासगी व सार्वजनिक कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतूच्या वापरास प्रोत्साहित करावे, सर्व संस्थांनी त्यांच्या कामाची जागा शिफ्टदरम्यान स्वच्छ करावी, मोठी संमेलने, बैठका प्रतिबंधित कराव्यात, असे यातून सूचवण्यात आले आहे.