संगमनेर – करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना, भाजीपाल्याच्या नावाखाली संगमनेरातून मुंबईकडे गोमांसची वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. 9 ते 14 एप्रिल दरम्यान पकडलेल्या तीन वाहनांतून सुमारे वीस टन गोवंशाचे मांस जप्त केले असून, वावी (नाशिक) पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नांदूरशिंगोटे शिवारात नाकाबंदी दरम्यान 9 एप्रिलला संध्याकाळी सातच्या सुमारास अझरूद्दीन जमालुद्दीन शेख (वय 27), अहसान मोहम्मद कुरेशी (वय 22) (दोघेही रा. कुर्ला पूर्व, मुंबई) हे टेम्पोतून मुंबईकडे गोमांस घेऊन चालले होते. हा टेम्पो पोलिसांनी पकडून त्यातील पाच लाख 48 हजार रुपये किंमतीचे 5 हजार 480 किलो मांस व तीन लाख 50 हजार रूपयांचा टेम्पो असा एकूण आठ लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 13 एप्रिलला रात्री पावणे अकराच्या सुमारास मोहमद युनूस याकुब कुरेशी (वय 42 ), महेशकुमार जयदेवप्रसाद शर्मा (वय 26) (दोघेही रा. कुरेशी नगर, कुर्ला, मुंबई) हे मालवाहू ट्रकमधून मुंबईकडे मांस घेऊन जात होते.
पोलिसांनी त्यांना पकडून ट्रकमधील 10 लाख रुपये किंमतीचे 10 हजार किलो मांस व 10 लाखांचा टेम्पो असा एकूण 20 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. 14 एप्रिलला रात्री सव्वा नऊच्या सुमारास इक्बाल अब्दुल रहमान खान (वय 29, रा. इंदिरानगर, कुर्ला पुर्व, मुंबई) अहेसान मोहमद कुरेशी (वय 22, कुर्ला, मुंबई) हे दोघे टेम्पोतून मुंबईकडे मांस घेऊन जात असताना त्यांना पोलिसांनी पकडले. त्यातील पाच लाख रुपये किंमतीचे पाच हजार किलो मांस व चार लाख 50 हजार रुपये किंमतीचा टेम्पो असा एकूण नऊ लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.दरम्यान गोवंशाचे प्रमुख केंद्र असलेल्या संगमनेरमधून संचारबंदीतही कत्तलखाने सुरू असल्याचे समोर आले.
जेथे करोनासंशयित व बाधित मिळाले तेथून जवळच असलेल्या कत्तलखान्यातून गोवंशाची कत्तल करण्याचा उद्योग बेमालूमपणे सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत सर्व प्रकारचे उद्योग आणि मालवाहतूकही बंद असताना तब्बल वीस टन गोवंशाचे मांस तीन वाहनांतून घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या आरोपींवर पोलिसांनी करावी केली आहे. लॉकडाऊनच्या काळात कत्तलखान्यांतून मांसची वाहतूक होतेच कशी हा धक्कादायक प्रकार कुणाच्या लक्षात आला नसेल का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या कारवाईने लॉकडाऊन काळातही संगमनेरात अवैध कत्तलखाने सुरू असल्याचे पुन्हा समोर आले आहे.